मुली आणि महिला यांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढणे हे समाज दिवसेंदिवस अधोगतीला जात असल्याचे लक्षण आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे हाच उपाय आहे !
सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जावळी तालुक्यातील जिवाजी साळुंखे (वय ८० वर्षे) यांना जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंड ठोठवला आहे. अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश पटणी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ही शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी ११ जानेवारी २०१८ यादिवशी मेढा पोलीस ठाण्यात जिवाजी साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. वर्ष २०१७ मध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात जिवाजी साळुंखे जावळी तालुक्यातील मजरे शेंबडी गावातील जननीमाता मंदिरात देखभालीचे काम करत होते. त्यांच्यासमवेत सहकार्य करणार्या व्यक्तीच्या मुलीवर जिवाजी साळुंखे यांनी लैंगिक अत्याचार केले. याविषयी कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलीने घाबरून या घटनेची वाच्यता कुठे केली नाही; मात्र कालांतराने ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते.