९ मासांनंतर चीन पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्य माघारी घेण्यास सहमत !

टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन सैन्य मागे घेणार

चीनने सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली असली, तरी चीन विश्‍वाघातकी देश असून त्याच्यावर विश्‍वास ठेवून निर्धास्त रहाता येणार नाही, हे लक्षात घेऊन भारताने डोळ्यांत तेल घालून सतर्क राहिले पाहिजे किंवा पुढे जाऊन आक्रमक होऊन चीनला धडा शिकवण्याचाही विचार केला पाहिजे !

नवी देहली – लडाख येथील पँगाँग तलावाच्या क्षेत्रात चीनने केलेल्या अतिक्रमणाविषयी झालेल्या सैन्याच्या ९ व्या फेरीतील चर्चेनंतर चीनने त्याचे सैन्य मागे घेत पूर्वीच्या ठिकाणी जाण्याचे मान्य केले. भारतानेही त्याचे सैन्य माघरी घेण्याचे मान्य केले आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन सीमेवरून सैन्य मागे घेईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. ‘भारत स्वतःची एक इंच भूमीही कुणाला घेऊ देणार नाही’, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी स्पष्ट केले. यामुळे गेल्या ९ मासांपासून सीमासंघर्षांमुळे भारत-चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळण्याचे संकेत आहेत.


पँगाँग तलावाच्या ठिकाणी चीनने ‘फिंगर फोर’पर्यंत सैन्य तैनात केल्याने वाद निर्माण झाला होता. चीनने येथे ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केल्यावर भारतानेही फिंगर ३ पर्यंत ५० सहस्र सैन्य तैनात केले होते. आता चर्चेनंतर पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्‍यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की,

 

राजनाथ सिंह

१. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावरील फिंगर ८च्या पूर्व दिशेला चीन त्याचे सैनिक तैनात करील, तर भारत फिंगर ३पर्यंत सैन्य तैनात करील.

२. पँगाँग सरोवराच्या परिसरातून दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ४८ घंट्यांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये बैठक होईल. अन्य सूत्रांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल.

३. चीनचे अयोग्य दावे भारताने कधीच मान्य केलेले नाहीत. तसेच ‘दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले, तरच द्विपक्षीय संबंध राखले जातील’, असे भारताने नेहमीच म्हटले आहे. पाकिस्तानने अवैधरित्या भारताची भूमी चीनला दिली. त्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही.

४. चीनने भारताच्या मोठ्या भूभागावर दावा सांगितला आहे; पण आम्ही त्याचा हा अयोग्य दावे कधीच मान्य कला नाही. लडाखमध्येही चीनने एकतर्फी चाल केली. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास समर्थ आहे. कराराचे उल्लंघन करून चीनने नियंत्रणरेषेवर मोठया संख्येने सैन्य तैनात केले, त्या वेळी भारतानेसुद्धा आपल्या हिताच्या दृष्टीने तशीच भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले.