राजकारण्यांना वगळून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय

दक्षिण भारतातील हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आघातांपासून रक्षण करण्यासाठी शंकराचार्य, साधू आणि संत यांची बैठक

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – हिंदु धर्म, मंदिरे आणि संप्रदाय यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा सिद्ध करून त्याला अंतिम रूप देण्यासाठी तिरुपती मंदिरातून ५० कि.मी. अंतरावर पोन्नडी गावात दक्षिणेकडील राज्यांतील महत्त्वाच्या हिंदु संतांची बैठक चालू आहे. आंध्रप्रदेशात अलीकडच्या काळात मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती यांची तोडफोड केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर या बैठकीचे महत्त्व अधिक मानले जात आहे. या बैठकीत साधू आणि संत यांनी पीडित हिंदूंना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदु धर्माचे आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत धर्मिक शक्तींना पाठिंबा आणि एकता यांचे महत्त्व व्यक्त करण्यात आले. राजकारण्यांना वेगळे ठेवून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला कांची कामकोटी पीठाचे विद्यमान शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी, श्रृंगेरी मठाचे प्रमुख शंकराचार्य श्री भारती तीर्थ स्वामी यांचे प्रतिनिधी श्री गौरीशंकर, पेजावर मठाचे प्रमुख विश्‍व प्रसन्ना तीर्थ स्वामी, हंपी विद्यारण्य महा संस्थान पीठाचे प्रमुख श्री विद्यारण्य भारती स्वामी, पुष्पागिरी मठाचे प्रमुख श्री विद्याशंकर भारती स्वामी, तुनी सच्चिदानंद तपोवन प्रमुख श्री सच्चिदानंद सरस्वती, अहोबीला मठ प्रमुख श्री रंगनाथ यतींद्र महा देसीकन यांचे प्रतिनिधी, भुवनेश्‍वरी महापीठ प्रमुख श्री कमलानंद भारती, श्री मामुक्षजून पीठाचे प्रमुख श्री सीताराम, ज्येष्ठ संपादक श्री कमलानंद भारती एमव्हीआर शास्त्री इत्यादी उपस्थित होते.

हिंदु धर्मावरील आक्रमणे चिंताजनक

साधू-संतांच्या या बैठकीत आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षापासून मंदिरांवर सातत्याने होणार्‍या आक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली गेली. पवित्र मूर्तींची तोडफोड, अनादर, मंदिरातील रथ जाळणे, मंदिरातील मालमत्ता आणि दागदागिने लुटणे असे अनेक प्रकार घडले आहेत. यामागे एक पूर्वनियोजित कट असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामागे राज्यशासनाची उदासीनता, वरपासून खालपर्यंत सत्ताधारी आस्थापनांची नकारात्मक मनोवृत्ती, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, हिंदुविरोधी प्रशासनाचा घृणास्पद कारभार, प्रशासनात हिंदुविरोधी कट्टरवादी विचारसरणी असणार्‍यांचा हस्तक्षेप या कारणांचा उहापोह करण्यात आला. मंदिरांचे प्रशासन अहिंदूंच्या हाती असणे, मंदिरांच्या पवित्र भागात इतर धर्मांचा अवैध प्रचार चालू असणे, उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे धर्मनिरपेक्षतेचे धडे उगाळण्याचे प्रयत्न आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने अनुचित प्रलोभन देऊन अन् बलपूर्वक धर्मांतर करणे, या गोष्टी खरोखरच चिंताजनक आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

राज्य सरकार आणि नेते यांना चेतावणी

बैठकीतील मान्यवर हे आंध्रप्रदेश सरकारवर अप्रसन्न असून त्यांनी शासनाविरुद्ध कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, धर्म संकटात असतांना धर्माचार्य गप्प राहू शकत नाहीत. जेव्हा विकृत मनोवृत्तीचे राजकीय पक्ष निवडणुका लढवण्यात अधिक व्यस्त झाले आहेत, त्यांच्या घाणेरड्या युक्तीने अन् भांडणातून परिस्थितीत गोंधळ माजवला आहे, जेव्हा प्रसारमाध्यमे, बुद्धीवादी आणि समाज नास्तिक अन् आसुरी शक्तींचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत, जेव्हा लोक गोंधळलेले आहेत आणि जिवावर उदार होऊन मार्गदर्शन शोधत आहेत, तेव्हा साधू-संतांनी आणि द्रष्ट्यांनी त्यांना मार्गदर्शन करायला हवे. यासाठी हिंदु समाजाला जागृत करण्याचा संदेश, तसेच राज्य सरकार आणि नेते यांना  कडक चेतावणी देण्याचे साधू-संत यांनी ठरवले आहे.

राष्ट्रपती कोविंद यांना पत्र

तेलंगाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि आंध्रप्रदेश राज्याचे न्यायिक पूर्वावलोकन समितीचे सदस्य डॉ. बुलुसु शिवशंकरा राव यांनी वैयक्तिक स्तरावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहिले आहे. ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा, तत्त्व आणि राजधर्म यांचा भाग असलेल्या घटनात्मक नैतिकतेनुसार मंदिर आणि देवता यांंच्या हक्कांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करा’, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.