आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करावा !

  • पाथर्डी (जिल्हा नगर) येथील मोहोटादेवी मंदिरात २ किलो सोन्याची सुवर्णयंत्रे पुरल्याचे प्रकरण

  • उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचा आदेश

आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र मंदिरात सुवर्णयंत्र पुरणे, योगिनींच्या संदर्भात पूजा करणे आदी हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

नगर – पाथर्डी तालुक्यातील मोहोटा गावातील मोहोटादेवी मंदिरात २ किलो सोन्याची सुवर्णयंत्रे सिद्ध करून मंत्रिकाद्वारे ती मंदिरात पुरण्यात आली होती. यामध्ये आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी सर्व तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ४ फेब्रुवारी या दिवशी दिला. ५ वर्षांनंतर ही कारवाई होत आहे. मोहोटादेवी मंदिर संस्थानचे विश्‍वस्त नामदेव गरड यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. वर्ष २०१६ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि एम्.जी. सेवलीकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

मंदिरात सोने पुरणे आणि त्यासाठी मोठा व्यय केल्याची चर्चा चालू झाल्यावर गरड यांनी माहितीच्या अधिकारात त्याविषयी माहिती मिळवली. देवस्थानच्या विश्‍वस्तांनी २ किलो सोने मंदिर परिसरात पुरले.

त्यासाठी होमहवन, पूजाअर्चा करण्यासाठी २५ लाख रुपये मजुरी मांत्रिकाला दिल्याचे उघड झाले होते. या जगदंबादेवी सार्वजनिक विश्‍वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश, तर ४ प्रशासकीय अधिकारी हे पदसिद्ध विश्‍वस्त असतात.

The case of a Maharashtra religious trust — whose chairman was a sitting district judge — which buried Rs 66 lakh worth of gold under Mohta Devi temple to ‘boost the power’ of the deity.

Posted by MumbaiMirror.com on Sunday, July 28, 2019

जिल्हा न्यायाधीश आणि पोलीस यांनी नोंद न घेतल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका

इतर १० विश्‍वस्तांची नेमणूक मोहोटा गाव आणि मोहोटा गावाबाहेरील भक्तांमधून होते. त्यामुळे या विरोधात दाद मागण्यासाठी गरड यांनी जिल्हा न्यायाधिशांकडे तक्रार केली; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तरीही त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी गरड यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती गरड यांनी केली होती. सोन्याची यंत्रे पुरल्याविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार केली होती, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

गुन्ह्याचे अन्वेषण अपर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांनी ६ मासांत करण्याचा आदेश

न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, विश्‍वस्तांनी धर्मादाय आयुक्तांची अनुमती न घेता ट्रस्टचा पैसा आणि सोने गैरकामासाठी वापरल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात योगिनी या देवतांची उपासना होत नाही. योगिनींच्या संदर्भात प्रसार करण्यातून अंधश्रद्धा वाढू शकतात. मोहटास्थित जगदंबा ही आदिशक्ति मानली जाते. आदिशक्ति काहीही करू शकते, असा विश्‍वास आहे. जर तसे आहे, तर आदिशक्ति काहीही करू शकेल, मग योगिनींच्या उपासनेसाठी यंत्रे का पुरायला हवीत ?, हा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे २ किलो सोने आणि २५ लाख रुपये अंधश्रद्धेपोटी वाया घालवण्याचे काम विश्‍वस्त मंडळाने केल्याचे दिसून येत आहे आणि न्यायाधीश विश्‍वस्त असल्यामुळे या गैरकारभारावर कार्यवाही झाली नसावी, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी सर्व तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा. या गुन्ह्याचे अन्वेषण अपर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांनी ६ मासांच्या आत करावे, असा आदेश न्यायमूर्ती नलवडे आणि न्यायमूर्ती सेवलीकर यांनी दिला.