नाशिक येथील गोदावरी नदीजवळ मोठा भूखंड कब्रस्थान म्हणून आरक्षित करण्याच्या कार्यवाहीस स्थगिती मिळावी ! – महंत श्री मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

महंत श्री मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

नाशिक – येथील गोदावरी नदीजवळ मोठा भूखंड कब्रस्थान म्हणून आरक्षित करण्याच्या कार्यवाहीस तातडीने स्थगिती मिळावी, अशी मागणी महंत श्री मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी निवेदनाद्वारे केली. नुकतीचच नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत नाशिक शिवार नानावली, गोदावरी नदीलगत सर्व्हे नं- ४०६ आणि ४०७ हा मोठा भूखंड आरक्षित करून मुसलमान समाजासाठी कब्रस्थान म्हणून तातडीने मुसलमान समाजाच्या कह्यात देण्यास मान्यता देण्यात आली. हा ठरावही संमत करण्यात आला आहे. या निर्णयाला येथील साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे.

महंत श्री मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी याविषयी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन सदर भूखंड कब्रस्थान म्हणून आरक्षित करण्याच्या कार्यवाहीस स्थगिती देण्याच्या मागणीसह हे कब्रस्थान स्थलांतरित करावे आणि शिस्त अन् न्याय या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच यात विशेष लक्ष द्यावे, अशा मागण्या केल्या. हे निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महंत श्री मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज म्हणाले…

१. नाशिक ही कुंंभनगरी म्हणून विश्‍वात प्रसिद्ध आहे. गोदावरी किंवा अन्य कोणत्याही नदीतटावर शास्त्रानुसार अग्निसंस्कार करण्याचेच विधान आहे.

२. हिंदूंची आस्था गोदावरी मातेवर आहे. अशा पवित्र नदीतटावर जर कब्रस्थान झाले, तर हा सर्व हिंदूंच्या भावनेचा, श्रद्धेचा आणि धर्माचा घोर अपमान आहे.

३. या निर्णयामुळे भविष्यात धर्मवाद किंवा हिंदु-मुसलमान धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रकार घडल्यास त्याचे दायित्व नाशिक महानगरपालिकेवर आणि विशेषकरून स्थायी समिती अन् विद्यमान अध्यक्ष यांच्यावर राहील.