एटा (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी महिलेची सरपंचपदी निवड झाल्याच्या वर्षभरानंतर प्रशासनाला जाग !

  • भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक होय !
  • उत्तरप्रदेश सरकारने याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
६५ वर्षीय बानो बेगम

एटा (उत्तरप्रदेश) – येथे मूळची पाकिस्तानच्या कराची येथील असणारी ६५ वर्षीय बानो बेगम ही महिला येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगामी सरपंच म्हणून काम करत असल्याची माहिती एक वर्षानंतर समोर आली. बानो या मागील ४० वर्षांपासून भारतात रहात आहेत. त्यांचा विवाह येथील एका स्थानिक व्यक्तीशी झाला असला, तरी त्यांच्याकडे पाकिस्तानी पारपत्र आहे. त्यांच्याकडे व्हिसा असून त्यांनी अनेकदा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. बानो बेगम यांना हंगामी सरपंच पदावरून हटवण्यात आले असून या प्रकरणी चौकशीचा, तसेच गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

एटाचे जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांनी बानो यांना आधारकार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे कशी काय मिळाली यासंदर्भात चौकशी करण्याचा आदेशही दिला आहे. (प्रशासनामध्ये राष्ट्रघातक्यांचा भरणा असल्यामुळे अशा घटना घडतात ! – संपादक) याच कागदपत्रांच्या आधारे बानो यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडण्यात आले आणि नंतर त्या सरपंच झाल्या. गावातीलच एका व्यक्तीने बानो यांच्या विरोधात तक्रार करत त्या पाकिस्तानी असल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.