जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारतांना कह्यात

असे भ्रष्ट पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ?

जळगाव, २० डिसेंबर (वार्ता.) – एका गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांनी १५ सहस्र रुपयांची मागणी केली होती. यामुळे संबंधित व्यक्तीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नाशिकच्या पथकाने १९ डिसेंबर या दिवशी संदीप हजारे यांना कह्यात घेतले असून त्यांच्या विरोधात एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अन्य एका घटनेत अलीकडेच बोदवड (जिल्हा जळगाव) येथे शेतकर्‍यास दिलेली नोटीस परत घेण्यासाठी त्याच्याकडे २ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणी बोदवडचे तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी अशा तीन कर्मचार्‍यांविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ डिसेंबरला कारवाई केली होती. (सरकारी कर्मचार्‍यांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण निंदनीय ! – संपादक)