स्वतःमधील शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागृत करून राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध व्हा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

श्री. निरंजन चोडणकर

रत्नागिरी – आज देव, देश आणि धर्म यांचे महत्त्व प्रत्येक युवकाने जाणून घ्यायला हवे. स्वतःमधील शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागृत करून राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक

श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. निरंजन चोडणकर पुढे म्हणाले,

१. आज कोरोना महामारीच्या काळात एका क्षणात देवाने हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले.

२. तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यातून जर वाचायचे असेल, तर साधनाच आवश्यक आहे. ‘मी माझ्या भक्तांचे रक्षण करणार’, असे वचन भगवंताने गीतेत दिले आहे.

३. आपल्या धर्माचे रक्षण झाले, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो खर्‍या अर्थाने विश्‍वगुरु होऊ शकतो. त्यामुळे सर्व युवांनी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.

४. छत्रपती शिवरायांनी अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्याची, तर स्वातंत्रवीर सावरकर यांनी वयाच्या १४ व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यची शपथ घेऊन संपूर्ण आयुष्य त्यासाठीच वाहून घेतले. त्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत.

५. तेलाचा कोलू फिरवतांना तेल प्रमाणापेक्षा अधिक भरल्यावर ‘या अधिक झालेल्या तेलात मी इंग्रज सरकारचे साम्राज्य बुडवून टाकीन’, असे शौर्यपूर्ण उत्तर सावरकरांनी इंग्रज अधिकार्‍याला दिले. यातून त्यांच्या नसानसांत भिनलेले राष्ट्रप्रेम आणि शौर्य, त्याग आपल्याला पहायला मिळाले.

६. राष्ट्रप्रेम, त्याग आणि शौर्य आपल्या सर्वांमध्ये जागृत करून भारतामध्ये आदर्श असे हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे.  यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलूया आणि प्रतिदिन १ घंटा नापजप आणि १ घंटा धर्मसेवा करूया.