गोहत्याबंदी कायद्यावरून कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी

काँग्रेसच्या आमदारांनी उपसभापतींना सभापतींच्या खुर्चीवरून खाली खेचले

  • गोहत्याबंदीचा विरोध करण्यासाठी विधान परिषदेत हाणामारी करणार्‍या धर्मांधप्रेमी काँग्रेसचे हे वास्तव हिंदूनी ओळखल्याने देशात तिचा सर्वत्र पराभव होत आहे. तरीही काँग्रेसला अद्याप शहाणपण आलेले नाही ! ‘काँग्रेस याच हिंदुद्वेषामुळे नष्ट होणार’, हे सांगायला आता ज्योतिषांची आवश्यकता नाही !
  • विधीमंडळाच्या सभागृहात हाणामारी करणार्‍या काँग्रेसच्या आमदारांची आमदारकी रहित करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला पाहिजे !
  • लहान मुले शाळेतही जे करत नाहीत, ते पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्याकडून ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणवल्या जाणार्‍या विधीमंडळात होते, हे भारतियांना लज्जास्पद !

बेंगळुरू – कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये गोहत्याबंदी कायद्यावरून सत्ताधारी भाजप आणि विराधी पक्ष काँग्रेस याच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसच्या सभासदांनी थेट सभापतींच्या आसनापर्यंत धाव घेत सभापतींच्या खुर्चीवर बसलेले उपसभापतींना खुर्चीवरून उठवले.

१. सभागृहाचे कामकाज चालू होताच विधानपरिषदेतील काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना बलपूर्वक खुर्चीवरून खेचून बाहेर काढले. ‘उपसभापतींनी सभापतींच्या खुर्चीवर बसणे घटनाविरोधी आहे’, असे या आमदारांचे म्हणणे होते. शेवटी सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करावा लागला.

२. उपमुख्यमंत्री अश्‍वथानारायण आणि काँग्रेस आमदार यांंमध्ये वादावादी चालू झाली. काँग्रेसने विधानपरिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्याबंदी विधेयकाच्या विरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाच्या विरोधात मतदान करायचे होते. संमतीआधी जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाच्या सदस्यांना हे विधेयक ‘सिलेक्ट समिती’कडे पाठवायचे होते.

३. भाजपचे आमदार लेहरसिंह सिरोया या घटनेवर म्हणाले की, काही आमदार गुंडासारखे वागले. त्यांनी उपसभापतींना बलपूर्वक खुर्चीवरून खेचले. त्यांच्यासमवेत गैरवर्तन केले. विधानपरिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस आम्ही पाहिलेला नाही. ‘लोक आमच्याविषयी काय विचार करतील’, या विचाराने मला लाज वाटते.

४. काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी मात्र भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या आमदारांनी उपसभापतींना सभागृहाचे आदेश नसतांना अवैधपणे खुर्चीवर बसवले. असे करून भाजपने राज्यघटनाविरोधी पाऊल उचलले. काँग्रेसने त्यांना खुर्चीवरून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर आम्हाला त्यांना खुर्चीवरून हटवावे लागले.