सागरी सुरक्षेतील आव्हाने आणि उपाय !

१. समुद्रमार्गे होणारी तस्करी थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक !

‘समुद्रकिनार्‍यावर तस्करीचे सर्वांत मोठे आव्हान आहे. ७० ते ८० च्या दशकांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. ही तस्करी गुजरातचा समुद्रकिनारा आणि खाडी देशांमधील तस्कर यांच्यात चालायची. सध्या इलेक्ट्रॉनिक तस्करी न्यून झाली असली, तरी अनेक ठिकाणांहून अमली पदार्थ, बनावट चलन, सोने यांची तस्करी अजूनही केली जाते. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण आशिया येथून बनावट चलन भारतात येते. तुम्ही वर्तमानपत्र वाचले असेल, तर काही दिवसांपूर्वी अन्वेषण यंत्रणांनी नवी मुंबई येथून अब्जावधी रुपयांचे अमली पदार्थ पकडले होते. ही तस्करी थांबवण्यासाठी नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस यांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक आहे.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. समुद्रमार्गे होणारा अवैध व्यापार थांबवण्यासाठी कायद्यांची योग्य कार्यवाही व्हायला हवी !

भारतात बंदरांच्या माध्यमांतून आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. देशात मोठ्या बंदरांच्या तुलनेत काही लहान बंदरेही आहेत. या लहान बंदरांमधून अनेक वेळा अवैध व्यापार होतो. अवैध व्यापार हा वैध व्यापाराच्या तुलनेत दुप्पट असल्याचे म्हटले जाते. बंदरांमध्ये अनेक मोठे कंटेनर येतात. प्रत्येक कंटेनरची पडताळणी वेळेअभावी करणे शक्य नसते. कंटेनरमध्ये १० कोटी रुपयांचे साहित्य असेल, तर ते १ कोटी रुपयांचे असल्याचे दाखवले जाते. अर्थात्च ९ कोटींच्या साहित्यावरील कर वाचवला जातो.

यासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये चांगले कायदे करण्यात आले आहेत. ते वापरत असलेल्या आधुनिक तंत्राचा आपणही अवलंब करायला हवा. ज्याप्रमाणे मोठ्या बोटींसाठी ‘आयएस्पीएस् कोड’ असतो, तसा लहान बोटींसाठीही लागू केला पाहिजे. तसेच सागरी सुरक्षेसाठी जे कायदे निर्माण केले आहेत, त्यांची योग्य कार्यवाही होते कि नाही, हे पहाण्याचे काम वर्षातून एकदा तरी झाले पाहिजे. हा अवैध व्यापार थांबवण्याचे दायित्व सीमा शुल्क विभाग, गुप्तचर यंत्रणा यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे आहे. त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचे काम केले पाहिजे.

३. भारतीय मासेमार पाकिस्तानमध्ये राहू नये, याकडे भारताने लक्ष देणे आवश्यक

अ. वर्ष १९९३ मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्या वेळी शेखाडी येथे स्फोटके उतरवण्यात आली. ती स्फोटके मुंबईपर्यंत आणण्यात पोलीस, सीमा शुल्क विभाग आणि स्थानिक व्यक्ती यांचा सहभाग होता. जर सुरक्षा यंत्रणा अशा प्रकारे काम करत असेल, तर देशाला धोका निर्माण होऊ शकतो.

आ. १०० ते १५० भारतीय मासेमार नेहमीच पाकिस्तानच्या कह्यात असतात आणि ५०-१०० पाकिस्तानी मासेमार भारतानेही पकडलेले असतात; पण पाकिस्तानमध्ये भारतीय मासेमारांना मारहाण करण्यात येते. त्यांचा छळ करण्यात येतो आणि त्यांच्याकडून भारताच्या विरोधात अवैध कामे करून घेतली जातात.

इ. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर आतंकवादी आक्रमण झाले होते. त्या वेळी कुबरे नावाच्या बोटीमधून आतंकवाद्यांनी भारतात प्रवेश केला होता. त्या बोटीचा मालक पाकिस्तानमध्ये २ वेळा जाऊन आला होता. तेव्हा पाकिस्तानने कदाचित् त्याच्यामध्ये परिवर्तन केले असावे. अशा घटना लक्षात घेता भारतीय मासेमार पाकिस्तानमध्ये अडकू नये, यासाठी भारताने सतर्क राहिले पाहिजे.

४. सागरी सुरक्षेसंबंधीच्या यंत्रणांनी आपसांत समन्वय साधून कार्य केल्यास देशाची सुरक्षा अबाधित राहू शकेल !

भारतामध्ये सागरी सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाच्या संस्था आणि दले आहेत. ‘सी.आय.एस्.एफ्.’ ही संस्था ‘ओ.एन्.जी.सी.’च्या ऑईल प्लॅटफॉर्मचे रक्षण करते. सागरी पोलिसांची अनुमाने ८-९ ठाणी असून प्रत्येकाकडे अनुमाने १५० पोलीस असतात. त्यांची गुप्तचर यंत्रणा चांगली असते. मासेमारी करणार्‍या बोटींची नोंदणी मासेमारी विभागाकडे असते. वायूदलानेही सागरी सुरक्षेसाठी सुखोई विमाने तैनात केली आहेत. सीमा सुरक्षा दलाची जलशाखा आहे. त्यांचे सैनिक कच्छच्या रणामध्ये तैनात आहेत. पाकिस्तानमधील घुसखोरी थांबवणे त्यांचे काम आहे. लाईट हाऊसेस समुद्रात जाणार्‍या बोटींचे ‘नेव्हीगेशन’ करतात. सीमा शुल्क विभाग आंतरराष्ट्रीय अवैध व्यापार किंवा तस्करी होऊ नये, याकडे लक्ष ठेवतो. त्यांनाही गस्तीसाठी काही बोटी देण्यात आल्या आहेत.

सागरी सुरक्षेमध्ये ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (एन्.एस्.जी.) ची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचे कमांडो आहेत. २६/११ च्या वेळी मुंबईवर आक्रमण झाले असता १० पैकी ८ आतंकवाद्यांना याच कमांडोंनी ठार मारले. बंदरांच्या आत विविध यंत्रणांचे कर्मचारी कार्य करत असतात. त्यांच्याकडून काही चुकीची कामे होत आहेत का ? यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवणे मोठे आव्हान असते. काही धार्मिक स्थळे बंदरांच्या आतील क्षेत्रात आहेत. त्या ठिकाणी काही बाहेरील लोक धार्मिक कृतींसाठी येतात, ते थांबवले पाहिजे. ही गोष्ट गुप्तचर संस्थांनी अनेक वेळा निदर्शनास आणून दिली आहे; परंतु त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.

५. राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून कार्य केल्यास देशाची सागरी सुरक्षा चांगली होईल !

अ. भारताची सागरी वाहतूक वाढत आहे. त्यामुळे अपघात आणि प्रदूषण यांचे धोकेही वाढत आहेत. देशासाठी चांगले दिवस येणारच आहेत. त्यामुळे आपण ज्याही क्षेत्रात कार्यरत असू, तेथे जागतिक स्तरावरील काम केले पाहिजे. त्याप्रमाणे सागरी सुरक्षा करतांना न्यूनतम साधनांमध्ये अधिकाधिक चांगले काम कसे करू शकतो, असा विचार केला पाहिजे.

आ. सागरी सुरक्षा करतांना ज्या अडचणी आपल्याला येतात, तेवढ्याच अडचणी चीन आणि पाकिस्तान या शत्रूराष्ट्रांनाही येत असतील. त्याचा अभ्यास करून त्यांच्या त्रुटींचा आपण लाभ उठवू शकतो.

इ. भारताच्या साडेतीन लाखांहून अधिक मासेमार बोटी समुद्रामध्ये फिरत असतात. त्यांच्यामध्ये सुरक्षारक्षक ठेवू शकतो का ? याचाही विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे बोटीतून ते सहजपणे टेहळणी करू शकतात. नंतर बोटींमध्ये पालट करू शकतो. अनेक संस्था बंदरांमध्ये कार्यरत असतात. त्यांच्या वाहनांमध्ये बसूनही सुरक्षेसंबंधीची कामे करू शकतो. त्यामुळे देशाचा सुरक्षेवरील व्यय न्यून होण्यास साहाय्य होईल. राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून सागरी सुरक्षेचे काम केले, तर आपण आपल्या देशाची सुरक्षा चांगल्या प्रकारे करून शत्रूपासून देशाचे रक्षण करू शकतो.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.