मुंबई – पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर १० डिसेंबर या दिवशी दगडफेक करून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात भाजपचे २ नेते घायाळ झाले होते. या आक्रमणाच्या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून तृणमूल काँग्रेसचा निषेध केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहनताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केलेले आक्रमण हे अतिशय निंदनीय अन् लज्जास्पद आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो. ममतादीदी, हीच लोकशाही आहे का ?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे.पी. नड्डा हे आक्रमणातून थोडक्यात वाचले. देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदी यांना दिलेले समर्थन पाहून विरोधकांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. भाजप अशा भ्याड आक्रमणांना कधीही घाबरणार नाही.