टॉप्स सिक्युरिटी’ आस्थापनाचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंद

मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी ज्यांच्या तक्रारीनंतर चालू झाली, ते ‘टॉप्स सिक्युरिटी’ या खाजगी आस्थापनाचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.


टॉप्स सिक्युरिटीचे अध्यक्ष राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरोधात १४ सप्टेंबर या दिवशी खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी ४ सप्टेंबर या दिवशी गुन्हा नोंदवून हे प्रकरण अन्वेषणासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. राहुल नंदा यांनी तक्रारीमध्ये रमेश अय्यर यांनी ‘टॉप्स सिक्युरिटी’चे ग्राहक प्रतिस्पर्धी आस्थापनाकडे वळवले. त्यामुळे ‘टॉप्स सिक्युरिटी’ आस्थापनाची कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून आता पुन्हा मुंबई पोलीस आणि केंद्रशासनाची अन्वेषण यंत्रणा एकमेकांसमोर येणार आहे. यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणांमध्ये काट-शह चालू होता. यातून महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यातील कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे.