|
बहरामपूर (बंगाल) – राज्याच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील श्रीरामपूर हे गाव बांगलादेश सीमेवर वसलेले असून येथे बांगलादेशी सिमकार्ड विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे सिमकार्ड सीमा सुरक्षा दलासाठी डोकेदुखी ठरले असून या सिमचे ‘लोकेशन’ शोधता येण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे दलाच्या अधिकार्यांनी सांगितले. भारत-बांगलादेश सीमेवर भारतात ५ किमी आतपर्यंत बांगलादेशातील दूरसंचार सेवा पुरवठादारांचे नेटवर्क उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर बांगलादेशी तस्कर सहजपणे करत आहेत. हे सिमकार्ड सीमावर्ती भारतीय गावांत सहज उपलब्ध झाल्याने भारताला ते अधिक धोकादायक ठरत आहे.
१. एका स्थानिक पोलीस अधिकार्याने सांगितले की, अलीकडे काही तस्कर बांगलादेश सीमेवर पळून जात असतांना त्यांचा एक भ्रमणभाष खाली पडल्याचे आम्हाला आढळले. त्यात बांगलादेशी सिम होते. यातून विदेशी सिम भारतीय भागात सक्रीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
२. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरचे पोलीस उपमहानिरीक्षक एन्.के. पांडे म्हणाले की, बांगलादेशी नेटवर्कचा वापर करून तस्करांचा माग काढणे, ही सर्वांत मोठी समस्या बनली आहे.
३. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका सिमकार्डची किंमत ५ सहस्र रुपये आहे. सीमावर्ती गावांमध्ये हे सिम किराणा दुकानांवर उपलब्ध असून ते हवे असल्यास ‘ते कुठे पोचवायचे’, याची माहिती मिळाल्यास तिसरी व्यक्ती कार्ड त्या ठिकाणी पोचवते. यामुळे कुणी अडकण्याचा धोका उद्भवत नाही.
मुर्शिदाबादमधील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेची दुःस्थिती !
येथे कुंपणाऐवजी काही अंतरावर एकेक खांब आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशाशी लागून तब्बल १२५ किमी लांबीची सीमा आहे. यांपैकी ४२ किमी भूमी आहे, उर्वरित पद्मा नदीची सीमा आहे. मुर्शिदाबादला लागून असलेल्या नादिया जिल्ह्यातील २०.६१ किमी परिसरात कुंपण नाही. या क्षेत्रातून गेल्या दीड महिन्यात येथून ५२ घुसखोर पकडण्यात आले आहेत. गेल्या बुधवारी १० बांगलादेशींसह ५ भारतीय दलालही पकडले गेले.
काही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, पद्मा नदीकाठी दुर्लभपूर गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात घुसखोरांनी वस्ती केली आहे. रहाणी, बोलणे, पेहराव सारखाच असल्याने त्यांची ओळख पटत नाही. हे लोक स्थानिक भारतियांचे नातेवाईक असल्याने पंचायतही त्यांच्याविषयीची माहिती अधिकार्यांना देत नाही.