समाजातील विवाह समारंभ आणि सनातन आश्रमातील विवाह सोहळा पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

सौ. बेबी बोरकर

१. पैशांची अनावश्यक उधळण अन् देवाविषयी श्रद्धा अल्प असणार्‍या समाजातील विवाहात विधींना जेमतेम महत्त्व असणे

‘समाजातील लग्न समारंभात अहंचा, म्हणजे मोठेपणाचा देखावा करतात. मोठेपणाचा आव आणून केलेली पैशांची अनावश्यक उधळण, देवाण-घेवाण, एकमेकांशी चढाओढ आणि हस्तांदोलन, पाश्‍चात्त्य पेहराव असलेले वधू-वर, असे दृश्य पहायला मिळते. पैशाचा वारेमाप व्यय (खर्च) करण्यात अधिक धन्यता मानली जाते आणि विधींना जेमतेम महत्त्व असते. देवाविषयी श्रद्धा अल्प असून  सर्वत्र बेगडी कृत्रिमता अधिक असते. लग्नाला अहेरातही मूल्यवान आणि मोठमोठ्या भेटवस्तूंचा ढिगारा असतो अन् त्यातच आनंद मानला जातो. लग्नाला आमदार, प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी आल्यास यजमानांना धन्यता वाटते.

२. रामनाथी आश्रमातील विवाह सोहळा, म्हणजे जणू भावसोहळाच असून तो पहातांना ‘देवलोकातच हा सोहळा चालू आहे’, असे जाणवणे

परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने मला सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) आश्रमातील विवाह सोहळा, म्हणजेच भाव सोहळा पहाण्याची संधी मिळाली. येथे देव आणि संत यांच्या आशीर्वादाला महत्त्व दिले जाते. पुरोहित शास्त्रशुद्ध, भावपूर्ण आणि लक्षपूर्वक विधी करत होते. सगळे विधी अगदी शांतपणे, भावपूर्ण अन् परिपूर्ण करण्याचा त्यांचा कल होता. कुठेही ना गोंधळ, ना गाजावाजा. साधक नमस्कार मुद्रेत राहून पाहुण्यांचे आदरातिथ्य करतांना दिसत होते. ‘जणू देवलोकात देव-देवी यांचा लग्न सोहळा चालू आहे’, असे मला जाणवले. ध्वनीवर्धकावर सतारवादन आणि सनई-चौघडा मध्यम स्वरांत लावले होते. या मंजुळ आणि आल्हाददायक वादनाने मनाला शांत अन् प्रसन्न वाटत होते.

३. समाजातील विवाह आणि सनातन आश्रमात झालेला विवाह यांत जमीन-आकाशाचा भेद जाणवणे

आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते. तेथे परंपरेनुसार श्री गणपतीला आर्ततेने भावस्पर्शी गीतातून विनवण्यात आले आणि गीत गायनातून त्या त्या देवतांना आवाहन केले गेले. जीवन आनंदी होण्यासाठी वधू-वरांनी देवाला प्रार्थना केली.

तेथे वधू-वरांना एक अप्रतिम भावस्पर्शी भावभेट दिली गेली. ती पुष्कळ अनमोल होती. ती भेट म्हणजे त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणार्‍या दोन कविता होत्या. त्या कवितांपुढे मला हिरे – माणकेही फिकी वाटली.

त्या वेळी समाजातील विवाह आणि आश्रमात झालेला विवाह यांत मला जमीन-आकाशाचा भेद जाणवला.

‘श्रीकृष्ण, परात्पर गुरुमाऊली, तुमच्या कृपेने हे लिहिले. ते तुमच्याच चरणी अर्पण होवो’, हीच प्रार्थना !’

– सौ. बेबी बोरकर, मडगाव, गोवा. (२२.११.२०१७)