(म्हणे) ‘न्यायी बळीराजाला वामनाने कपटाने मारले !’ – प्रभाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते

पौराणिक कथांमधील घटनांचा भावार्थ लक्षात न घेता केवळ बौद्धिक तर्क काढून त्याचा अर्थ काढायचा आणि समाजाचा बुद्धिभेद करायचा, हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे काम आहे. त्यामुळे जनतेने अशा चुकीच्या अपप्रचाराला बळी न पडता शास्त्र समजून घेऊन बुद्धिवाद्यांच्या तर्कांचे खंडण केले पाहिजे अन् सणही साजरे केले पाहिजेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) – बळीराजा हा न्यायी, प्रेमळ, समतावादी, लोककल्याणकारी आणि दानशूर राजा होता. त्याला वामनाने कपटाने मारून त्याचे राज्य हिरावून घेतले होते. (श्रीविष्णूचा अवतार वामनाने बळीराजाला कपटाने मारलेले नसून वामनाने मागितलेल्या भिक्षेत त्याने स्वत:चे राज्य दिले होते. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषच असतो. कुणाला काय, केव्हा आणि कुठे दान द्यावे, याचा निश्‍चित विचार आहे अन् तो शास्त्रात, तसेच गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. त्यामुळेच बळीराजाची दानशूरता ही दोष ठरली होती ! त्यासाठी श्रीविष्णूला वामनाचा अवतार घेऊन त्याचा उद्धार करावा लागला ! – संपादक) महाराष्ट्रात शेतकर्‍याला ‘बळीराजा’ म्हटले जाते. त्यामुळे या न्यायी आणि प्रजाप्रिय राजाचा अवमान हा इथल्या बहुजन समाजाचा अवमान आहे. तेव्हा न्यायी बळीराजाचा अवमान करणार्‍या चित्रांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर नारकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन प्रा. एस्.व्ही. जाधव, प्रदीप ढोबळे, प्रतिमा परदेशी, डॉ. विवेक कोरडे, राहुल गायकवाड आदींनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. याविषयीचे वृत्त दैनिक ‘तरुण भारत’च्या कोकण आवृत्तीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. शतकानुशतके बहुजन समाज ‘बळीचे राज्य पुन्हा यावे’, अशी आस लावून बसला आहे. (प्रत्यक्षात बळीराजाने नरकचतुर्दशीपासून यमद्वितीयेपर्यंतचे (भाऊबीजेपर्यंतचे) ३ दिवसच आपले राज्य पृथ्वीवर असावे, असे म्हटले आहे. – संपादक) बहुजन मायभगिनी, तर प्रत्येक दिवाळीला भावाला ओवाळतांना ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, असे म्हणत आल्या आहेत.

२. बळीराजा नेमका कोण ? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, कपिल या तत्त्ववेत्त्यांचा वारसा लाभलेला विरोचन पुत्र, प्रल्हादाचा नातू म्हणजे बळीराजा ! अनेक पुराणकथांमधील संदर्भ पाहिल्यास बळीराजाचा वारसा स्पष्ट तर होतोच; पण त्याचा दैदीप्यमान इतिहासपटही आपल्यासमोर येतो. (ऐतिहासिक आदर्श सांगतांना हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या पुराणकथांमधील असुरांचा संदर्भ कशाला द्यायचा ? विष्णूभक्त प्रल्हादाचा वारसा सांगणे योग्य आहे ! – संपादक)

३. बळीराजा आपल्या राज्यात होणार्‍या उत्पन्नाचे आणि संपत्तीचे समान अन् न्यायपूर्वक वाटणी करणारा राजा होता. (असे असले, तरी बळीराजा कुणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. त्यामुळे अपात्र व्यक्तींच्या हाती दान जाऊन ते उन्मत्त होऊ नयेत, यासाठी भगवान श्रीविष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेऊन बळीराजाकडे त्रिपाद भूमीदान मागितले. या वेळी कोणताही विचार न करता बळीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याचसमवेत वामनाने विराटरूप धारण करून एका पावलाने पृथ्वी, दुसर्‍या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि तिसरे पाऊल बळीराजाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मस्तकावर ठेवले आणि त्याला पाताळात पाठवले, असे शास्त्र सांगते. – संपादक) रामायण आणि महाभारत यांतही ‘संविभागी राजा’ म्हणून त्याला संबोधले गेले आहे.

४. तमिळनाडूमध्ये चेन्नईपासून ५० कि.मी.वर महाबलीपूरम् नावाचे गाव आहे. महाबलीपूरम् हे नाव बळीराजाची स्मृती म्हणून देण्यात आले असावे, हे स्पष्ट आहे.

५. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातही बळीराजाचा उल्लेख असून म. फुले यांनीही पोवाडा लिहित बळीराजाची वेगळ्या पद्धतीने मांडणी केली. अशा बळीराजाचे चित्र चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर बंदी घालण्यात यावी.