वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी

जिल्हा कारागृहातील बंदीवान राजेश गावकर यांच्या मृत्यूचे प्रकरण

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस प्रशासन स्वतःहून या गोष्टींची नोंद घेऊन तत्परतेने कारवाई का करत नाही ?

डॉ. रोहिणी सोळुंके कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सावंतवाडी – येथील जिल्हा कारागृहातील बंदीवान राजेश गावकर यांच्या मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसेच्या वतीने मोर्चा काढू, अशी चेतावणी  सावंतवाडी तालुका मनसेच्या वतीने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके यांना निवेदनाद्वारे दिली आहे. या वेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, अधिवक्ता अनिल केसरकर, आकाश परब, शुभम् सावंत, गौरेश गावडे आदी उपस्थित होते.

 

 या निवेदनात म्हटले की, या प्रकरणी जिल्हा कारागृह अधीक्षक योगेश पाटील आणि त्यांचे सहकारी झिलबा पांढरमिसे यांच्यावर राजेश गावकर मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींनी जिल्हा आणि सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग अन् मुंबई उच्च न्यायालय येथे जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज दोन्ही न्यायालयांनी फेटाळला आहे. या प्रकरणात सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी आरोपी योगेश पाटील आणि पांढरमिसे यांना वाचवण्यासाठी दोषारोपपत्र वेळेत सादर केले नाही. त्यामुळे संबंधित सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, तसेच आरोपी पसार आहेत, असे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात वेळ घालवला. या वेळी डॉ. रोहिणी सोळुंके कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.