कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव
‘देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. विशेषत: मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच काळात एका साधिकेलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यानिमित्ताने तिच्या उपचारांच्या निमित्ताने प्रशासकीय यंत्रणांशी जवळून संपर्क आला. त्या वेळी साधकाला आलेले कटू अनुभव प्रकाशित करत आहोत. या माध्यमातून प्रशासकीय स्तरावरील त्रुटी दूर होऊन लोकांना सुराज्य मिळावे, ही अपेक्षा आहे.
१. खासगी प्रयोगशाळेने मुंबई महानगरपालिकेला साधिकेचा कोरोनाचा अहवाल पाठवलाच नाही !
दादर येथील ‘मेट्रो पॉलीस’ या खासगी प्रयोगशाळेमध्ये साधिकेची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल २ दिवसांनी ‘ई-मेल’द्वारे मिळाला. अहवालानुसार साधिकेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील उपचारांविषयी कसे करायचे, याविषयी प्रयोगशाळेतील परिचारिकेला विचारले. तेव्हा त्यांनी ‘मुंबई महानगरपालिकेकडे कळवतो. ते तुम्हाला संपर्क करतील’, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र अहवाल प्राप्त झाल्याच्या दुसर्या दिवसापर्यंत पालिका प्रशासनाकडून कोणताही संपर्क करण्यात आला नाही. याविषयी मुंबई महानगरपालिकेच्या ‘कोविड साहाय्य केंद्रा’मध्ये दूरभाष करून माहिती दिली. त्यांना साधिकेचे नाव सांगितले; मात्र खासगी प्रयोगशाळेतून साधिकेचे नाव नोंदवलेच नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मी स्वत: त्यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी साधिकेच्या नावाची नोंद करून मला नोंदणी क्रमांक दिला.
२. खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करणार्या रुग्णाकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष
नोंदणी केल्यानंतर पहिले ३ दिवस पालिकेचा वैद्यकीय विभाग दूरभाषवरून रुग्णाची माहिती घेत होता; मात्र रुग्णांवर पुढील उपचार कुठे करायचे ? त्यांना कोणत्या रुग्णालयात भरती करायचे ? त्यांच्यासाठीची औषधे ?, यांविषयीची कोणतीच माहिती दिली जात नव्हती. एका परिचारिकेने तिला ठाऊक असलेले काही घरगुती उपचार करायला सांगितले. शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर तेथील आधुनिक वैद्यांच्या पहाणीखाली उपचार होतात; मात्र खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केल्यावर रुग्णाच्या पुढील उपचारांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले.
३. घरी अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांसाठी ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ गोळ्या नाहीत !
शासकीय रुग्णालयात उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या गोळ्या दिल्या जातात; मात्र घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या गोळ्या दिल्या जात नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या ‘नायगाव प्रसुतीगृह आणि दवाखाना’ येथे कोरोना उपचार केंद्र चालू करण्यात आले होते. त्या ठिकाणी मी साधिकेसाठी गोळ्या आणण्यासाठी गेलो असता तेथे ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ गोळ्या केवळ वैद्यकीय कर्मचार्यांसाठीच असल्याचे सांगून गोळ्या देण्यास नकार दिला. याविषयी मी माझ्या परिचित असलेल्या एका आधुनिक वैद्यांना माहिती दिली. त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क केल्यावर मला गोळ्या देण्यात आल्या.
४. शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य अधिकार्यांना कोरोना रुग्णांना देण्यात येणार्या गोळ्यांचे प्रमाण ठाऊक नसणे
कोरोनाबाधित रुग्णाला ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या किती गोळ्या द्यायच्या, याचे प्रमाण भारतीय चिकित्सा परिषदेने निश्चित करून दिले आहे. त्याविषयी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. प्रत्यक्षात अनेक शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य अधिकार्यांना हे प्रमाण माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी मला अल्प गोळ्या दिल्या. याविषयी त्या आधुनिक वैद्यांनी मला मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक दिले. ते घेऊन चिकित्सालयात गेल्यावर मला त्यानुसार गोळ्या देण्यात आल्या.
५. कोरोना उपचार केंद्रातील वैद्यकीय कर्मचार्यांची संवेदनशून्यता !
‘नायगाव प्रसुतीगृह आणि दवाखाना’ येथील कोरोना उपचार केंद्रातील आधुनिक वैद्य सागर कोळी यांनी मला अलगीकरणात असलेल्या रुग्णाचा अर्ज भरून देण्यास सांगितले. अर्ज घेण्यासाठी त्यांनी मला दुपारी ३ वाजता बोलावले. त्यानुसार रुग्णालयात गेलो असता ते वैद्य उपस्थित नव्हते. त्यामुळे दुसर्या दिवशी पुन्हा रुग्णालयात गेलो; मात्र तेव्हाही आधुनिक वैद्य आले नव्हते. तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचार्यांकडे अर्जाची मागणी करूनही कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी ‘आधुनिक वैद्य सागर कोळी आल्यावर ते अर्ज देतील’, असे सांगितले. नंतर आधुनिक वैद्य डॉ. सागर कोळी यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजले; मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहकार्यांनीही दुर्लक्ष केले. शेवटी साधिकेचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आणि सुदैवाने ती कोरोनामुक्तही झाली, तरी तिचा अर्ज भरून घेण्यात आला नाही. त्याविषयी रुग्णालयातून कुणी विचारणाही केली नाही. यावरून अलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांविषयी कोरोना उपचार केंद्रांची संवेदनशून्यता दिसून आली.
६. आठवडाभर पाठपुरावा करूनही इमारत ‘सॅनिटाईझ’ करण्याविषयी प्रशासनाची उदासीनता
साधिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर मी नायगाव येथील ‘कोरोना उपचार केंद्र’ आणि ‘महानगरपालिका कोविड साहाय्य केंद्र’ येथे दूरभाष करून इमारत ‘सॅनिटाईझ’ (निर्जंतुक) करण्याची विनंती केली. यासाठी आठवडाभर पाठपुरावा केला; मात्र कुणीही लक्ष दिले नाही. याविषयी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. उर्मिला पांचाळ यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी इमारत ‘सॅनिटाईझ’ करण्यासाठी कर्मचारी पाठवले. यातून ‘कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची रहाती इमारत ‘सॅनिटाईझ’ करण्याविषयी प्रशासनाची किती गांभीर्यशून्यता आहे’, हे दिसून आले.
७. रुग्णाच्या छातीत दुखत असतांना पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून रुग्णवाहिका उपलब्ध न होणे
एका रात्री कोरोनाबाधित साधिकेच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे दक्षता म्हणून कोविड साहाय्य केंद्राच्या ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिकेची मागणी केली आणि पाठपुरावाही केला. अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णाला अचानक त्रास होत असल्यावरही प्रशासनाकडून रुग्णवाहिका वेळेत आली नाही. दळणवळण बंदीमुळे खासगी वाहनेही बंद होती. त्यामुळे अशा स्थितीत रुग्णाच्या प्राणावरही बेतण्याची शक्यता होती.
८. रुग्णाच्या छातीत दुखत असतांना प्रशासनाकडून खाट उपलब्ध न होणे
साधिकेच्या छातीत दुखत असल्यामुळे रात्री-अपरात्री काही प्रसंग ओढवू नये; म्हणून आधुनिक वैद्यांनी रुग्ण तिला रुग्णालयात भरती करण्याविषयी सांगितले. त्यानुसार कोविड साहाय्य केंद्रात माहिती दिली. तेथे २-३ वेळा संपर्क केल्यानंतर ‘खाट उपलब्ध झाल्यास कळवतो’, असे सांगितले; मात्र शेवटपर्यंत त्याविषयी काहीच कळवले नाही. सुदैवाने साधिकेच्या छातीत दुखायचे थांबल्यामुळे तिला पुढे रुग्णालयात भरती करावे लागले नाही. ‘जर रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली असती, तर प्रशासनाने काय उपाययोजना केली असती’, असा प्रश्न निर्माण होतो.
९. रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रशासनाने माहिती न घेणे
औषधे आणि अलगीकरण यानंतर साधिका कोरोनामुक्त झाली. ती कोरोनाबाधित नाही ना, याची निश्चिती करून घेण्यासाठी तिची दुसरी चाचणी करणे आवश्यक होते. साधिका यापूर्वी पोलीसदलात नोकरी करत असल्यामुळे नायगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या आरोग्य केंद्रातून चाचणीसाठीचे पत्र मिळाले. महापालिका प्रशासनाकडून मात्र शेवटपर्यंत ती कोरोनामुक्त झाली का, याविषयी कोणतीही माहिती घेण्यात आली नाही. यातून प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा प्रत्यय आला.
१०. अत्यावश्यक सूचना लावण्यात न आल्याने रुग्णालयांमध्ये येणार्या नागरिकांचा गोंधळ
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांच्या आवारांमध्ये नेमका कोरोनाबाधित रुग्णांचा विभाग कुठे आहे ? संशयित रुग्णांची चाचणी कुठे होईल ? औषधे कुठे मिळतील ?, यांविषयी मार्गदर्शक सूचना लावलेल्या नाहीत. त्यामुळे याविषयी माहिती घेण्यातच नवीन येणारे रुग्ण आणि नातेवाईक यांचा वेळ जात होता. पालिकेचे ‘कस्तुरबा’, ‘के.ई.एम्.’ आणि ‘नायर’ आदी रुग्णालयांमध्ये अशी स्थिती पहायला मिळाली. एकीकडे शासन सर्दी, ताप, खोकला आदी कोरोनाची लक्षणे आढळल्यास ‘खासगी आधुनिक वैद्यांकडे जाण्याऐवजी शासकीय रुग्णालयात जा’, असे आवाहन करत आहे; मात्र त्या ठिकाणी आवश्यक त्या सूचनाही लावण्यात आल्या नाहीत. यातून प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार कसा चालतो, हे लक्षात आले.
११. रुग्णाच्या संपर्कात येणार्या व्यक्तींच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक !
साधिकेचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यानंतर ‘तिच्या सहवासात आल्यामुळे मी आणि सहसाधक दोघांचीही कोरोना चाचणी करून घ्यावी’, अशी मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा, के.ई.एम्., नायर आदी रुग्णालयांमध्ये जाऊन विनंती केली; परंतु कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे आमची चाचणी करण्यात आली नाही. यापूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत होती आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या घरी किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत होते; मात्र नंतर-नंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली आणि प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागला. त्यामुळे केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांचीच कोरोना चाचणी करण्याचे धोरण शासनाने घोषित केले. सध्या राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत; मात्र ते कोरोनाबाधित आहेत. हे लक्षात घेतले, तर कोरोनाची लक्षणे नसणार्या रुग्णाचे कुटुंबीय कोरोनाबाधित असण्याची शक्यता अधिक आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष करणे, म्हणजे एक प्रकारे प्रशासकीय मान्यतेने कोरोनाचा संसर्ग वाढवण्याला अनुमती देण्यासारखेच आहे. याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
१२. रुग्णालयामध्ये कोरोनाचे संशयित आणि बाधित रुग्ण एकाच रांगेत उभे राहिल्याने संक्रमण वाढू शकते, याचेही भान नसणारे प्रशासन !
नायर रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयाच्या बाहेर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे; मात्र त्या ठिकाणी कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांनी कुठे उभे रहायचे, याविषयी कोणत्याही मार्गदर्शक सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी कोरोना संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण एकाच रांगेत उभे रहात असत. या ठिकाणी शारीरिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने उभे रहाण्यासाठी आखणी करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात नागरिक दाटीवाटीने उभे रहात होते. यातून रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येत होता. कोरोनाबाधित रुग्णांकडून अन्य नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची प्रशासनाकडून काळजी न घेणे, म्हणजे महामारीच्या प्रसाराला साहाय्य करण्यासारखेच होते.
१३. सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना चाचणी करून घेणे, म्हणजे मनस्ताप !
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये केवळ पोलीस कर्मचारी किंवा रुग्णालयातील कर्मचारीवर्ग यांची चाचणी केली जाते. ‘के.ई.एम्.’ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यांना कोरोनाची लक्षणे आढळली, तरच ते रुग्णालयात भरती होण्यास सांगतात आणि रुग्णालयात भरती केल्यानंतरच कोरोनाची चाचणी करतात. मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा, ‘के.ई.एम्.’ आदी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक, संशयित रुग्ण यांची वर्दळ इतकी असते की, कोरोनामुक्त असलेली व्यक्ती तेथे गेल्यास तिलाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी प्रयोगशाळेत चाचणी करायची झाल्यास ४ सहस्र ५०० रुपये मोजावे लागतात, तसेच ‘एम्.डी.’ किंवा ‘एम्.बी.बी.एस्.’ आधुनिक वैद्यांचे अनुमतीपत्रही लागते. सद्यःस्थितीत खासगी आधुनिक वैद्य कोरोना संशयित व्यक्तींची पडताळणी करायला सिद्ध होत नाहीत. याकरता खासगी आधुनिक वैद्य शासकीय रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत कोरोना चाचणी करून घेणे, ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अक्षरश: मनस्तापाचा विषय ठरला आहे.
१४. रुग्णालयांच्या बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची परवड
‘के.ई.एम्.’ रुग्णालयाच्या आवारात आणि आतमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक बसलेले आणि पहुडलेले दिसत होते. नायर रुग्णालयातील कोविड विभागाच्या बाहेर, तर उपचार घेणार्या कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रात्रंदिवस रहात होते. त्यांना रुग्णालयाच्या बाहेर भूमीवरच साधा पुठ्ठा टाकून झोपावे लागत होते. त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर बाहेरील नातेवाइकांची रडारड हा नित्याचाच विषय होता.
१५. कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास त्याविषयी रुग्णाला न कळवण्याची अयोग्य पद्धत
साधिकेच्या संपर्कात आल्याने मी नायर रुग्णालयामध्ये स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. त्या वेळी ‘अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असेल, तर २४ घंट्यांमध्ये तुम्हाला दूरभाषवर कळवले जाईल आणि अहवाल ‘निगेटिव्ह’ असेल, तर कळवण्यात येणार नाही. तुम्हाला अहवाल हवा असल्यास रुग्णालयातून घेऊन जावा लागेल’, असे सांगण्यात आले. माझी कोरोना चाचणी झाल्यावर २४ घंट्यामध्ये मला दूरभाषवर कळवले गेले नाही. त्यामुळे माझा अहवाल कदाचित् ‘निगेटिव्ह’, असावा, असे मला धरून चालावे लागले. मी २ दिवसांनी अहवाल आणण्यासाठी रुग्णालयात गेलो. प्रत्यक्षात माझा चाचणीचा अहवाल आला नव्हता. त्यामुळे मला अहवाल घेण्यासाठी दुसर्या दिवशी बोलावण्यात आले. अहवालाविषयी दूरभाषवरून चौकशी करण्यासाठी दूरभाष क्रमांक मागितला, तर तशी कोणतीही व्यवस्था तेथे करण्यात आली नसल्याचे लक्षात आले. कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला पुन:पुन्हा यायला लावणे; म्हणजे त्याला बाधित करण्यासाठी हातभार लावण्यासारखे आहे; पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. अहवाल नकारात्मक किंवा सकारात्मक, असा कोणताही आला, तरी अशा भयप्रद परिस्थितीमध्ये संबंधितांना कळवणे आवश्यक आहे.
१६. ‘२४ घंट्यांमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल मिळेल’, असे शासनाने सांगणे, ही लोकांच्या डोळ्यांत धूळफेक !
‘कोरोना चाचणीचा अहवाल २४ घंट्यांमध्ये मिळेल’, असे शासनाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र खासगी किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी केल्यावर २४ घंटेच काय, तर ४८ घंटे झाल्यानंतरही अहवाल प्राप्त होत नाही. त्यामुळे ‘२४ घंट्यांमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल मिळेल’, ही घोषणा लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक ठरत आहे.’
– श्री. प्रीतम नाचणकर, वार्ताहर, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (२८.८.२०२०)
भारताची रुग्णांच्या संदर्भातील केविलवाणी दशा !
कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना रुग्णांना एकूण प्रशासन आणि रुग्णालय यांच्याविषयी येत असलेले वाईट अनुभव हे संबंधितांना लज्जास्पद आहेत. या लेखावरून भारतातील रुग्णांच्या संदर्भात किती केविलवाणी दशा आहे, हेच दिसून येते. अशा हलगर्जी आणि दायित्वशून्य प्रशासनाकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्याविषयी केला जाणारा हलगर्जीपणा हिंदु राष्ट्रात (ईश्वरी राज्यात) नसेल, तर प्रत्येक रुग्णाची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेण्यात येईल. या लेखात दिल्याप्रमाणे कुणाला असे वाईट अनुभव आले असल्यास नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा ! – संपादक
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. तसेच लेखात रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे. – संपादक |