संतप्त व्यावसायिकांची समुद्रात उपोषण करण्याची चेतावणी
मालवण – राज्यशासनाने पर्यटनाला अनुमती दिल्यानंतर वाढत्या पर्यटकांचा विचार करून मालवण येथे काही ‘जलक्रीडा’ (वॉटर स्पोर्ट्सना) व्यावसायिकांनी जलक्रीडा प्रकारांना प्रारंभ केला. याविषयी माहिती मिळाल्यानंतर १८ नोव्हेंबरला बंदर विभागाच्या पथकाने ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी राज्यशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगत अवैधपणे व्यवसाय करणार्या ‘जलक्रीडा’ व्यावसायिकांवर कारवाई केली. या वेळी संतप्त व्यावसायिकांनी ‘कारवाई न थांबवल्यास समुद्रातच उपोषण करू’, अशी चेतावणी दिली; मात्र शासनाकडून सूचना प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत कारवाई चालूच राहील, अशी चेतावणी प्रादेशिक बंदर अधिकारी बी.एन्. सूरज नाईक यांनी दिली आहे.
या कारवाईनंतर मालवण तहसील कार्यालयात प्रशासन आणि ‘जलक्रीडा’ व्यावसायिक यांची बैठक झाली. या वेळी आमदार वैभव नाईक, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक, प्रभारी तहसीलदार आनंद मालवणकर, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरि खोबरेकर, तसेच मालवण, दांडी, देवबाग, चिवला, सर्जेकोट येथील व्यावसायिक उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाचे सीईओ आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याशी याविषयी भ्रमणभाषवरून चर्चा केली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सचिवांनाही याविषयी माहिती दिल्याचे सांगितले. लवकरच ‘जलक्रीडा’ प्रकार चालू करण्यास अनुमती मिळेल, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी या वेळी दिली. या वेळी भाजप, काँग्रेस या पक्षांच्या पदाधिकार्यांनीही जलक्रीडा व्यावसायिकांना त्यांचा पाठिंबा दर्शवला.
गेले ८ मास कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. पर्यटनाला अनुमती देऊन हॉटेल व्यवसायालाही अनुमती दिली गेली; मात्र जलक्रीडा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा शासन उगारते. पर्यटक माघारी गेल्याने आमची मोठी हानी होत आहे. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा, असे प्रश्न उपस्थित करत ‘प्रशासनाने आम्हाला तात्काळ अनुमती द्यावी, अन्यथा समुद्रात उपोषण करू’, अशी चेतावणी ‘जलक्रीडा’ व्यावसायिकांनी दिली. |