सोलापूर येथे वसुबारसच्या दिवशी ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा पार पडला

सोलापूर – दीपावलीतील वसुबारस (१२ नोव्हेंबर) या दिवशी ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा गणपति घाट येथील दत्त मंदिरात पार पडला. श्री दत्त संप्रदायामध्ये ‘वेदतुल्य’ असे स्थान असणारा ‘श्रीगुरुचरित्र’ हा ग्रंथ कडगंची (कर्नाटक राज्य) येथे लिहिला गेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदशास्त्रसंपन्न श्री. विठ्ठल (दादा) शिरसीकर हे होते, तर दत्तसंप्रदायाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक श्री. नरेंद्र कुंटे, कडगंची देवस्थानचे अध्यक्ष श्री. शिवशरण मादगोंड अप्पाजी, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

१. या वेळी कडगंची येथील श्रीकरुणा पादुकाही भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भगवान परळीकर आणि रामेश्‍वर विभूते यांनी केले, तर झाड जेम्स अँड ज्वेलर्सचे प्रो.प्रा. प्रेमनाथ झाड यांनी आभार मानले.

२. ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथ हा ७ सहस्र ४९१ ओव्या आणि ९२७ पानांचा असून प्रकाशन मूल्य ५५० रुपये आहे; मात्र दत्त भक्तांच्या सेवेसाठी हा ग्रंथ ५० रुपये सवलतीच्या दरात (५०० रुपये) सोलापूर येथील मंगळवार पेठ पोलीस चौकीच्या समोर असणार्‍या झाड जेम्स अँड ज्वेलरी, तसेच हेरीटेज मंगल कार्यालयासमोरील झाड बॅग मॉल येथे  उपलब्ध आहे.

सद्गुरुंच्या सेवेमध्ये आपल्यातील दोष न्यून होतात ! – प्राध्यापक नरेंद्र कुंटे

आपण जन्माला येतांना सुख, दुःख, गुण आणि दोष हेही समवेत घेऊन येतो; मात्र सद्गुरूंची सेवा करतांना आपण घेऊन आलेले दोष न्यून होतात आणि सद्गुण वाढतात. परमार्थाच्या सेवेमध्ये व्यक्तीचे परिवर्तन होणे ही सद्गुरूंची कृपाच असते. आपल्या आत्म्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी ‘श्रीगुरुचरित्र’ या पवित्र ग्रंथांचे पारायण करायला हवे.