तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांचा आधारस्तंभ असलेले डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवलीतील सनातन संस्थेचे साधक श्री. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. १७.११.२०२० या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

कै. श्री अजय संभूस

१. प्रेमभाव

१ अ. ‘प्रत्येक साधक गुरुदेवांचा आहे’, या भावाने स्थलांतर प्रक्रियेसाठी साधकांना साहाय्य करणे : ‘सध्या स्थलांतर करण्यासाठी काकांनी साधकांना ‘घर विक्रीसाठी प्राथमिक बोलणी करणे, साधकांच्या घरमालकांशी आपुलकीने बोलणे’, यांसाठी साहाय्य केले. त्यामुळे साधकांना ‘काका म्हणजे घरातील वडीलधारी व्यक्ती वाटून त्यांचा आधार वाटे. हे सर्व करतांना काकांचा ‘ही माझ्या घरातील सेवा आहे आणि प्रत्येक जण गुरुदेवांचा साधक आहे’, असा भाव असायचा.’

– सौ. वैशाली कोथमिरे, ठाणे

१ आ. ‘काकांना भ्रमणभाष केल्यावर ते घरातील सर्वांची प्रेमाने विचारपूस करायचे. तेव्हा काकांचे निरपेक्ष प्रेम पाहून माझे मन भरून यायचे.’ – श्री. वीरेश अहिर, अंबरनाथ

१ इ. सर्व साधकांशी प्रेमाने जवळीक साधणे : ‘काही वर्षांपूर्वी काकांकडे एक सेवा होती. विशेष पूर्वानुभव नसतांनासुद्धा त्यांनी ही सेवा स्वीकारली होती. ते जेव्हा सत्संग घ्यायचे, तेव्हा त्यामध्ये कुणालाही ताण येत नसे. ते सर्वांशी सहजतेने बोलायचे आणि सर्वांकडून प्रेमाने सेवा करवून घ्यायचे. त्यांनी सर्व साधकांना प्रेमाने बांधून ठेवले होते. त्यामुळे काकांनी अकस्मात् एखादी सेवा सांगितली, तरी साधक ती सकारात्मकतेने स्वीकारत असत.’

– श्री. भारत नकाते आणि सौ. राजश्री महाजन, कल्याण

१ ई. साधकांच्या चुका प्रेमाने सांगणे : ‘एकदा मला सेवेच्या ठिकाणी पोचायला उशीर झाला आणि पहिल्या व्यक्तीला भेटायची वेळ निघून गेली होती.  जेव्हा मला माझी ही चूक सांगितली, तेव्हा मला जराही राग आला नाही, वाईट वाटले नाही आणि परकेपणासुद्धा जाणवला नाही. ‘एखाद्या साधकाची चूक साधकाला न दुखावता प्रेमाने कशी सांगायला हवी ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.’ – श्री. उल्हास चौधरी, अंबरनाथ

२. सहजता

‘काका नेहमी सहजतेने बोलायचे. ते बोलतांना हलकेपणा जाणवायचा आणि कसलाही ताण नसायचा. ते बर्‍याच वेळा गंमतही करायचे. काकांना आम्ही एकदा आमच्या घरातील कार्यक्रमात छायाचित्रे काढण्यास बोलावले होते. त्या वेळी काका सहजतेने आमच्या सर्व नातेवाइकांमध्ये मिसळले. डोंबिवलीत काकांचे घर मध्यवर्ती आहे. अनेक कार्यक्रम आणि संतांचे सत्संग त्यांच्याकडेच होत असत.’ – सौ. नेहाली शिंपी, डोंबिवली

३. नियोजनबद्धता

‘प्रतिष्ठित व्यक्तींना केव्हा संपर्क केला, तर त्यांची भेट होऊ शकते ?’, हे काकांना अतिशय चांगले ठाऊक होते. एकदा मला उल्हासनगर येथील प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेण्यासाठी जायचे होते. त्या वेळी मी संभूसकाकांना माझ्या समवेत येण्यास सांगितले. काकांनी सर्वांशी आधीच बोलून ठेवले होते आणि प्रत्येकाच्या वेळा घेतल्या होत्या.

४. समाजातील व्यक्तींनाही साहाय्य करणे

काका नेहमी इतरांना साहाय्य करायचे. एकदा मी एका संपर्कासाठी गेलो होतो. तेथे त्या जिज्ञासूंनी काकांची चौकशी करत त्यांच्याविषयी एक प्रसंग मला सांगितला. एकदा त्या जिज्ञासूंचा अपघात झाला होता. तेव्हा कुणीही त्यांना साहाय्य करत नव्हते. जेव्हा काकांनी हे पाहिले, तेव्हा त्यांनी त्वरित त्यांना तिथून उचलून सुखरूप घरी सोडले होते.’

– श्री. माधव साठे, कल्याण

५. उत्तम छायाचित्रकार

‘देवद आश्रम येथे सनातन संस्थेच्या कार्यक्रमात छायाचित्रण करण्याची सेवा काका आवडीने आणि मनापासून करत. काकांचा छायाचित्रण आणि छायाचित्रक यांचा चांगला अभ्यास होता. ते एक उत्तम छायाचित्रकार होते. वयाच्या ६० व्या वर्षीही ते ‘चांगले छायाचित्र यावे’, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत.’

– सौ. वैशाली कोथमिरे

६. शिकण्याची वृत्ती

‘काकांनी फेसबूक आणि ट्विटर या सोशल मिडियाच्या सेवा आवडीने आणि प्रयत्नपूर्वक शिकून घेतल्या. प्रत्येक सेवा ते बारकाव्याने अभ्यास करून आणि विचारून करत. कुठे अडले, तर भ्रमणभाषवरून विचारून तांत्रिक भाग शिकून ते ती सेवा करत.’ – सौ. हर्षा देवघरे, कळवा, ठाणे.

७. समाजातील व्यक्ती सनातन संस्थेच्या विरोधात रागावून बोलली, तरी तिला शांतपणे उत्तर देणे

‘प्रसारातील सेवा करतांना समाजातील एखादी व्यक्ती संस्थेच्या विरोधात रागावून बोलली, तरी काका तिचे बोलणे ऐकून घ्यायचे आणि शांतपणे उत्तर द्यायचे. एकदा असा प्रसंग घडल्यावर मी काकांना म्हणालो, ‘‘तुम्ही शांत कसे राहू शकता ? मी अस्थिर झालो असतो.’’ त्यावर काकांनी पुष्कळ प्रेरणादायी उत्तर दिले, ‘‘कुणी कसाही असो; परंतु आपण डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागायचे.’’

– श्री. भारत नकाते

८. ‘परात्पर गुरूंनी आपल्याला कसे घडवले ?’, हे कृतीतून शिकवणारे संभूसकाका !

‘एकदा मी काकांच्या समवेत उल्हासनगर येथील पू. साई महाराज यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तेथे काका पू. साई महाराजांच्या चरणांशी जाऊन बसले आणि मी आसंदीत बसलो. त्या वेळी मला माझी चूक लक्षात आली. मग मीसुद्धा पू. साई महाराज यांच्या चरणांजवळ जाऊन बसलो. आम्ही बाहेर आलो. तेव्हा काकांनी ‘आपण सनातन संस्थेचे साधक असून आपल्याला शिकवलेले आदर्श आणि ‘गुरुदेवांनी आपल्याला कसे घडवले आहे ?’, ते समाजाला कळले पाहिजे’, असे मला सांगितले.’ – श्री. उल्हास चौधरी

९. चांगल्या प्रतीचे स्वतःचे सर्व साहित्य सेवेसाठी वापरावयास देणे

‘जेव्हा मी सोशल मिडियाची सेवा करायला लागले, तेव्हा काकांशी संपर्क वाढला आणि जवळीकही झाली. आरंभी जेव्हा सोशल मिडियाच्या सेवा चालू झाल्या, तेव्हा फेसबूक ‘लाइव्ह’ करण्यासाठी साहित्याची आवश्यकता होती. तेव्हा काकांचा व्यवसाय असल्याने ते सर्व साहित्य मला सेवेसाठी देत असत. त्यांची सेवेची तळमळ असल्याने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले चांगल्या प्रतीचे छायाचित्रक, ट्रायपॉड, लेन्स अशा सर्व वस्तू काका सहजतेने द्यायचे. त्यांना सर्व साहित्याचे पुष्कळ चांगले ज्ञान असल्याने माझ्या सर्व शंका काका आनंदाने सोडवायचे. सोशल मिडिया सेवेअंतर्गत ‘अजून काय मिळू शकते ? कुठे मिळू शकते ?’, हेसुद्धा ते सांगायचे. जिल्ह्यात आंदोलन असतांना काका स्वतःहून भ्रमणभाष करून ‘कोणते साहित्य लागणार आहे का ?’, असे विचारून त्याप्रमाणे साहित्य काढून ठेवायचे. ठाणे, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांत अनेक आंदोलने, हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि अधिवेशन अशा महत्त्वपूर्ण सेवा ‘लाइव्ह’ करणे, हे त्यांच्या साहित्यामुळे सहजतेने शक्य झाले. ही केवळ गुरुकृपाच आहे.

१०. अनोळखी व्यक्तीस सेवेचे महत्त्व सांगून तिला सेवेसाठी लागणारी वस्तू विनामूल्य देण्यास उद्युक्त करणे

एकदा पनवेलमधील मोठ्या सभेसाठी एक छायाचित्रक ‘लेन्स’ हवी होती. तेव्हा ती लेन्स डोंबिवली येथील दुकानात उपलब्ध होती; परंतु तिचे भाडे ७०० रुपये एवढे होते. ती व्यक्ती काकांच्या ओळखीची नव्हती, तरी काका म्हणाले, ‘‘मी तिच्याशी बोलतो.’’ तेव्हा काकांनी त्या व्यक्तीला हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी सांगितले, तसेच सेवेचे महत्त्व सांगितले. तेव्हा ती व्यक्ती ‘लेन्स’ विनामूल्य देण्यास सिद्ध झाली. ‘केव्हाही तुम्ही सेवेसाठी घ्या’, असेही त्या व्यक्तीने काकांना सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व काकांनी भ्रमणभाषवर बोलून केले होते.’

– सौ. नेहाली शिंपी

११. आध्यात्मिक मित्र

‘मी काकांशी मनमोकळेपणे बोलायचो. ते मला व्यष्टी आणि समष्टी साधनेत, तसेच अन्य काही अडचण आली की, साहाय्य करायचे. त्यामुळे काका माझे ‘आध्यात्मिक मित्र’ होते.’

– श्री. प्रशांत सुर्वे, कळवा, ठाणे.

१२. व्यष्टी साधनेची तीव्र तळमळ

१२ अ. प्रयत्न अल्प पडत असल्याविषयी खंत वाटणे : ‘काही कारणामुळे माझ्याकडून बरेच दिवस व्यष्टी साधनेचा आढावा देणे झाले नाही. तेव्हा काकांनी ४ – ५ वेळा भ्रमणभाष करून ‘आढावा चालू करूया. त्यामुळे नियमित प्रयत्न होतात. आपले प्रयत्न आणि तळमळ अल्प पडते. त्यामुळे पू. जाधवकाकूंचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी आपण प्रार्थना करूया’, असे सांगितले. यातून काकांची व्यष्टी साधनेची तळमळ आणि प्रयत्न अल्प पडत असल्याची खंत दिसून येत होती.

१२ आ. सहजतेने आणि मनमोकळेपणाने आढावा देणे

१. व्यष्टी आढावा देतांना काका सर्व प्रसंग, मनात येणारे नकारात्मक विचार आणि प्रतिमेचे विचार प्रांजळपणे अन् मोकळेपणाने मांडत. त्यामुळे इतरांनाही ‘मोकळेपणाने कसे बोलायचे ?’ हे शिकायला मिळत असे.’

– सौ. चारुशीला नकाते, कल्याण

२. ‘काही मास मी आणि काका व्यष्टी साधनेच्या एकाच आढावा गटात होतो. तेव्हा काकांकडून मला व्यष्टी आढाव्याचे गांभीर्य शिकायला मिळाले. अनेक वेळा आढाव्याला मी आणि काका, असे दोघेच असायचो. आम्ही एकमेकांचा आढावा घ्यायचो. त्यामध्ये काकांचे ‘लहान होणे, सर्वांना सामावून घेणे’, हे गुण माझ्या लक्षात यायचे. काका सहजतेने मला आढावा सांगायचे. मी जे प्रयत्न सांगत असे, ते काका कृतीत आणायचे. काही दिवस गटाचा व्यष्टी साधनेचा आढावा मला घेण्यास सांगितला होता. त्या वेळी काकांनी ते सहजतेने स्वीकारले. ते सहजतेने आढावा द्यायचे. काकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया पुष्कळ चांगल्या प्रकारे समजली होती. ‘कोणत्या दोषावर कशी सूचना द्यायला हवी ?’, हे काका अचूकतेने सांगायचे. – सौ. नेहाली शिंपी

१३. ‘हिंदु जनजागृती समिती’अंतर्गत विविध स्तरांवर जनसंपर्क करून त्यातून जिज्ञासूंना सनातन संस्थेशी जोडणे

१३ अ. समाजातील विविध स्तरांतील लोकांशी संपर्क असणे : ‘संभूसकाका अभ्यासू होते. गेली अनेक वर्षे ते हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि जनसंपर्क सेवा करत होते. आधुनिक वैद्य, पत्रकार, राजकारणी, हिंदुत्वनिष्ठ, बांधकाम व्यावसायिक, तसेच समाजातील विविध स्तरांतील लोक यांच्या संपर्कात होते. काका सर्वांशी अभ्यासपूर्ण आणि संयमाने बोलत. त्यामुळे अनेक जण सनातन संस्थेशी जोडले होते. समाजातील लोकही काकांशी ‘सनातनचे साधक’ म्हणून आदराने वागत.

१३ आ. उत्तम निरीक्षणक्षमता आणि अभ्यासपूर्ण संपर्क यांमुळे फलनिष्पत्ती चांगली असणे : चांगल्या निरीक्षणक्षमतेमुळे ‘कुणाला किती वेळ द्यायचा ? कुणाशी भ्रमणभाष करून बोलायचे ?’, हे त्यांच्या लक्षात यायचे. त्यामुळेच काकांनी केलेले वाचक संपर्क, अधिवेशन संपर्क आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपर्क यांची फलनिष्पत्ती चांगली होती. काकांचा वैयक्तिक संपर्क करण्याचा भाग चांगला असल्यामुळे शिबिरामध्ये ‘ऑनलाइन’ अभ्यासवर्गात त्यांचा प्रायोगिक भाग दाखवत असत.’

– सौ. वैशाली कोथमिरे, ठाणे

१३ इ. संपर्क करतांना समोरील व्यक्तीचा अभ्यास करून बोलणे : ‘एका कार्यक्रमासाठी बदलापूर येथील रामगिरी आश्रम येथील स्वामींना बोलवायला मी काकांच्या समवेत गेलो होतो. तेव्हा मला त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. काकांचे बोलणे मृदू, प्रेमळ, आदरयुक्त आणि नम्रतापूर्वक होते. संपर्क करतांना काका समोरील व्यक्तीचा अभ्यास करून त्याला कळेल अशा शब्दांंत बोलायचे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीने संपर्क करण्यातून बरेच जण सनातन संस्थेशी जोडले गेले आहेत.’

– श्री. वीरेश अहिर, अंबरनाथ

१३ ई. नेमकेपणाने आपले म्हणणे मांडून संपर्कसेवा उत्तम प्रकारे करणे : ‘मला बर्‍याच वेळा काकांच्या समवेत संपर्क सेवा करण्याची संधी मिळाली. काका जेव्हा संपर्क करायचे, तेव्हा ते समोरच्या व्यक्तीची सर्व सूत्रे पूर्ण ऐकून घ्यायचे आणि त्यांना समर्पक उत्तरेही द्यायचे. ते नेहमी न्यूनतम शब्दांत नेमकेपणाने स्वत:चे म्हणणे दुसर्‍यासमोर मांडायचे. बरेच जण काकांना ओळखायचे आणि त्यांची आपुलकीने चौकशीसुद्धा करायचे.’

– श्री. माधव साठे, कल्याण आणि श्री. विजय लोटलीकर, डोंबिवली पूर्व

१४. सहजतेने जवळीक साधणारे आणि सर्वांना आधार वाटणारे संभूसकाका !

‘आम्ही वयाने लहान असूनही ते आमच्यामध्ये सहजतेने मिसळत असत. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात विविध आंदोलनांमध्ये आणि सभांमध्ये त्यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांना होत असे. हिंदु धर्मजागृतीच्या कार्यात त्यांचा अनुभव पुष्कळ अधिक होता. ते सहजतेने हिंदुत्वनिष्ठ, संघटना आणि धर्मप्रेमी यांच्याशी जवळीक निर्माण करायचे. धर्मरक्षणाच्या कार्यात सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. समाजातील अनेक लेखक, हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, साहित्यिक, संघटना, संप्रदाय यांच्याशी काकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.’ – श्री. सुनील कदम, ठाणे

१५. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व

‘वर्ष २००२ पासून मी काकांना अनेक सेवा करतांना पाहिले आहे. काकांचा जनसंपर्क पुष्कळ मोठा असल्याने जिल्ह्यातील कोणतेही संपर्क ते सहजतेने करत. सर्व जण काकांना ‘सनातनचे संभूस’ म्हणून ओळखत. समितीच्या स्थापनेपासून ते वर्ष २०१५ – १६ पर्यंत काका सभा, मेळावे, नामदिंडी, प्रायोजक आणि इतर साहाय्य मिळवणे, या सेवा समितीअंतर्गत करत असत. ‘अधिवेशन सत्रात मंत्रालयात आपला विषय पोचवणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाविषयी जागृती करणे’, यासाठी काकांनी आमदार, खासदार अन् नगरसेवक यांना पुष्कळ चांगले संपर्क केले होते. ‘धर्मजागृती सभांमध्ये विषय मांडणे, कौशल्यपूर्ण व्यावसायिकाप्रमाणे चांगले छायाचित्र काढणे, चांगले संपर्क करणे’, यांतून काकांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व दिसून येते.’

– श्री. विनोद पालन, ठाणे

१६. परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातन संस्था यांची अपकीर्ती करणार्‍यांवर  न्यायालयात खटला प्रविष्ट केल्यावर न्यायालयाने आरोपींना दंड ठोठावणे आणि त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेणे

‘श्री. अजय संभूस हे एक तत्त्वनिष्ठ, अभ्यासू आणि प्रामाणिक हिंदुत्वनिष्ठ होते. वर्ष २००५ च्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला कल्याणच्या साप्ताहिकात कार्यरत असणारे पत्रकार आणि व्यंगचित्रकार श्री. महेंद्र पंडित आले होते. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातन संस्था यांची माहिती जाणून घेतली. त्या वेळी कोल्हापूर येथील तोडकर महाराज यांच्यावर अश्‍लील आरोप करून त्यांना अटक झाली होती. याचा अपलाभ घेऊन पंडित यांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे व्यंगचित्र काढून त्यांच्या साप्ताहिकात प्रसिद्ध केले. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातन संस्था यांची अपकीर्ती होऊन समाजात चुकीची प्रतिमा निर्माण झाली. तेव्हा अजयदादा आणि मी तिथे उपस्थित होतो. आम्ही पंडित यांच्यावर कल्याणच्या न्यायालयात खटला प्रविष्ट केला. तेव्हा दादांनी प्रामाणिकपणे आणि तत्त्वनिष्ठपणे साक्ष दिली. यामुळे आरोपी पंडित यांना न्यायालयाने २ सहस्र रुपये दंड ठोठावला आणि त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. त्यांचा प्रथम गुन्हा म्हणून ताकीद दिली. याचा लाभ असा झाला की, नंतर पंडित अथवा इतर कुणीही अपकीर्ती करणारे लिखाण छापले नाही. तेव्हा दादांनी दाखवलेले धैर्य, संयम आणि चिकाटी या गुणांमुळे हा खटला आम्ही जिंकलो.’ – अधिवक्ता विवेक भावे, कल्याण

१७. भाव

‘सनातन संस्थेचे कोणतेही उत्पादन किंवा ग्रंथ वितरण करतांना ‘ते किती अनमोल आहे’, असा त्यांचा भाव असायचा. त्यामुळे जिज्ञासूंचाही त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटायचा.’ – श्री. माधव साठे

१८. ‘काकांची साधना अंतर्मनातून साधना चालू आहे’, असे जाणवणे

‘काकांची साधना अंतर्मनातून चांगली चालू आहे’, असे सतत वाटायचे. कोणत्याही प्रसंगाला काका एकदम धैर्याने आणि संयमाने सामोरे जायचे. काका रुग्णालयात भरती झाले, तेव्हा त्यांच्याशी बोलणे झाले. त्या वेळीही काका एकदम स्थिर होते.’ – श्री. विजय लोटलीकर

१९. गेल्या काही दिवसांमध्ये काकांमध्ये जाणवलेले पालट

१९ अ. ‘काकांशी सेवेनिमित्त बोलतांना गेल्या काही दिवसांत त्यांच्यामध्ये पुष्कळ स्थिरता आणि बोलण्यात आनंद जाणवायचा.’ – श्री. सुनील कदम

१९ आ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : ‘मधल्या काळातील व्यावहारिक कल सोडून मागील दीड वर्षात काकांचे सेवेचे प्रयत्न वाढले होते. या कालावधीत अनुभवी असूनही काका मी सांगितलेली सूत्रे ऐकत, स्वीकारत, उपक्रमांतर्गत सांगितलेले पालट स्वीकारत आणि विचारून घेऊन कृती करत असत. हे पालट मी अनुभवले. अनुभवी असण्याचा अहं त्यांच्यात जाणवत नसे.’ – श्री. विनोद पालन

(समाप्त) 

अजय संभूस यांच्या मृत्यूनंतर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. काकांचा मृत्यू स्वीकारता न येणे; परंतु गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर ते स्वीकारता येणे : ‘काकांना देवाज्ञा झाली’, हे ऐकून पुष्कळ रडू आले. पुष्कळ वेळ मला ते स्वीकारता येत नव्हते. ‘त्यांना बरे नाही’, हे मला ठाऊक होते; पण ‘ते आता बरे होतील आणि सेवा चालू करतील’, असे विचार माझ्या मनात येत होते. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर ‘त्यांना आता वेगळ्या सेवा दिल्या आहेत आणि त्या ते करतील’, असे वाटले. – सौ. नेहाली शिंपी, डोंबिवली

२. ‘एकूणच काकांचे जाणे, म्हणजे एक आधारस्तंभ हरवल्यासारखे आहे.’ – श्री. विनोद पालन, ठाणे

३. काकांच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयीचे विचार मनात येऊन मन अस्थिर होणे आणि ‘मृत्यूनंतर प्रत्येक जिवाची काळजी भगवंत घेणार आहे’, असा काकांचा आवाज ऐकू आल्याने मन शांत होऊन नामजप चालू होणे : ‘काकांच्या मृत्यूचे वृत्त मला स्वीकारता येत नव्हते. त्यांच्या मृत्यूमुळे मायेचे विचार येऊन माझे मन अस्थिर झाले. ‘मृत्यूनंतर त्यांचा प्रवास कसा असेल ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी मला काकांचा आवाज ऐकू आला. ‘मला भास होत आहे’, या विचाराने मी आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मी लक्षपूर्वक आवाज ऐकू लागले. त्या वेळी ‘किशोरीताई, साधना करणार्‍या प्रत्येक जिवाची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरची काळजी भगवंत घेत आहे’, असा आवाज आला. तेव्हा काकांचा आवाज हलका आणि आनंदी वाटत होता. या उत्तराने माझे मन शांत झाले आणि ‘आपण अधिकाधिक सेवा करूया’, असा विचार येऊन माझा नामजप चालू झाला.’ – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (११.११.२०२०)

अंजय संभूस यांच्या मृत्यूच्या संदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना

काकांची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप मिळाल्यावर खोलीत कीटक जमा होणे, त्या वेळी ‘काहीतरी वाईट वृत्त कळणार’, असे वाटणे आणि ‘गुरुमाऊली काकांचा त्रास संपवणार आहेत’, असा विचार मनात येणे : ‘४.११.२०२० ला रात्री ‘काकांची प्राणवायूची पातळी न्यून झाली असून प्रकृती गंभीर आहे’, असा निरोप मिळाला. तेव्हा ‘गुरुमाऊली काकांचा त्रास लवकरच संपवणार आहेत’, असे वाटले. त्या वेळी माझ्या खोलीत कीटक जमा झाले होते. खिडकीजवळ ते मोठ्या प्रमाणात होते. तेव्हा ‘काहीतरी वाईट वृत्त कळणार’, असे माझ्या मनामध्ये आले; पण त्याच क्षणी ‘गुरुमाऊली काकांचा पुढील प्रवास सुखकर करणार’, या विचाराने कृतज्ञता वाटत होती. ही सूत्रे लिहित असतांना भावजागृती होत होती.’

– सौ. वैशाली कोथमिरे, ठाणे

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक