‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी’ यासाठी १०.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लघु गणहोम करण्यास सांगितले. महर्षींच्या आज्ञेनुसार गणपतिपुरा (गुजरात) येथील गणेश मंदिरातील गणेशाच्या मूर्तीप्रमाणे चांदीच्या ३ मूर्ती बनवण्यात आल्या. लघु गणहोमाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चांदीच्या तिन्ही गणेशमूर्तींचे पूजन केले.
‘पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी पुढे कळवले की, महर्षींनी सांगितले आहे, ‘जन्मोत्सवाच्या दिवशी जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले सत्यनारायण रूपात असतील, तेव्हा तीन चांदीच्या मूर्तींमधील एक मूर्ती त्यांच्या उजव्या बाजूला ठेवावी, एक मूर्ती डाव्या बाजूला आणि एक मूर्ती समोरच्या बाजूला ठेवावी. मूर्ती ठेवतांना तिचे तोंड परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिशेने असावे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याजवळ ठेवण्यात येणारा चांदीचा गणपति या दिवशी घडणार्या गुरूंच्या सत्यनारायण रूपातील जन्मोत्सवाचा साक्षी देव असणार आहे. श्रीवत्सपदक धारण विधी झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तीन मूर्तींतील एक मूर्ती सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आणि एक मूर्ती सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना द्यावी. दोन्ही सद्गुरूंनी श्रीगुरूंनी त्यांना दिलेल्या गणेशाला ‘आत्मार्थ गणेश’ याप्रमाणे त्याच्याकडे बघावे. जसे भगवान शिवाचे ‘आत्मलिंग’ असते, तसा हा ‘आत्मार्थ गणेश’ आहे.’ (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)
११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात चांदीच्या तिन्ही गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या. श्रीवत्सपदक धारण विधी (जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा विधी) झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तीन मूर्तींतील एक मूर्ती सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आणि एक मूर्ती सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिली.
‘लघु गणहोमाच्या वेळी सद्गुरुद्वयींनी चांदीच्या तिन्ही गणेशमूर्तींचे पूजन केल्यावर, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात त्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या गणेशमूर्तींवर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया‘च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. (हे लिखाण वर्ष २०१९ मधील असल्याने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांचा उल्लेख आधीप्रमाणेच ठेवला आहे. – संकलक)
१. चाचणीचे स्वरूप
१०.५.२०१९ या दिवशी लघु गणहोमापूर्वी आणि लघु गणहोमानंतर तिन्ही गणेशमूर्तींच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
११.५.२०१९ या दिवशी तिन्ही मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात ठेवण्यात आल्या. जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिन्ही मूर्तींच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
टीप १ – लघु गणहोमानंतर केलेल्या मोजण्यांच्या नोंदी याच मूर्तींच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वीच्या नोंदी आहेत.
टीप २- चाचणीतील तीन मूर्तींना इथून पुढे लेखात ‘श्री गणेशमूर्ती क्र. १’, ‘श्री गणेशमूर्ती क्र. २’ आणि ‘श्री गणेशमूर्ती क्र. ३’, असे संबोधले आहे.
टीप ३ – जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘श्री गणेशमूर्ती क्र. १’ सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आणि ‘श्री गणेशमूर्ती क्र. ३’ सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दिली. ‘श्री गणेशमूर्ती क्र. २’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवण्यात आली.
वाचकांना सूचना : या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
२ अ १. चाचणीतील तिन्ही गणेशमूर्तींमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.
२ आ १. लघु गणहोमानंतर तिन्ही गणेशमूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात ठेवल्यानंतर त्या मूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी वाढ होणे
टीप – लघु गणहोमानंतर मूर्तींच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी याच जन्मोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वीच्या मूर्तींच्या नोंदी आहेत.
२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा नमुना म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची एकूण प्रभावळ मोजतात. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.
२ इ १. लघु गणहोमानंतर तिन्ही गणेशमूर्तींच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात ठेवल्यानंतर त्या मूर्तींच्या एकूण प्रभावळीत आणखी वाढ होणे
टीप – लघु गणहोमानंतर मूर्तींच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी याच जन्मोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वीच्या मूर्तींच्या नोंदी आहेत.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र ‘३’ मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गणेशमूर्तींचे भावपूर्ण पूजन केल्याने मूर्तींतील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे : १०.५.२०१९ या दिवशी आश्रमात लघु गणहोम करण्यात आला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तिन्ही गणेशमूर्तींचे अतिशय भावपूर्ण पूजन केले. त्यामुळे तिन्ही मूर्तींमध्ये श्री गणेश तत्त्व आकृष्ट होऊन ते कार्यरत झाले. त्यामुळे लघु गणहोमानंतर तिन्ही मूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर तिन्ही गणेशमूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होण्यामागील कारण : मयन महर्षींनी सांगितल्यानुसार जन्मोत्सवाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले सत्यनारायण रूपात असतांना तीन चांदीच्या मूर्तींतील एक मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या बाजूला, एक मूर्ती डाव्या बाजूला आणि एक मूर्ती समोरच्या बाजूला ठेवण्यात आली. मूर्ती ठेवतांना तिचे तोंड परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिशेने केले होते. श्रीवत्सपदकधारण विधी झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तीन मूर्तींतील एक मूर्ती सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आणि एक मूर्ती सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिली. महर्षींनी सांगितले की, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याजवळ ठेवण्यात येणारा चांदीचा गणपति या दिवशी घडणार्या गुरूंच्या सत्यनारायण रूपातील जन्मोत्सवाचा साक्षी देव असणार आहे. तीन मूर्तींतील एक मूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवावी. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या चांदीच्या मूर्तीला फुले अर्पण करावी. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी, यांसाठी काळानुसार श्री गणेशाची उपासना आवश्यक आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले.
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांनी केवळ काही सेकंद हस्तस्पर्श केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य निर्माण होते वा त्यात वाढ होते. महर्षींचा संकल्प, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींचे केलेले आज्ञापालन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्य यांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या हस्ते दोन्ही सद्गुरूंना गणेशमूर्ती दिल्यावर त्या मूर्तींमधील चैतन्यात वाढ झाली. त्यामुळे जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर मूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाल्याचे दिसून आले.
येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे लघु गणहोमानंतर आणि जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर तिन्ही मूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत (चैतन्यात) झालेली वाढ ही सारख्याच प्रमाणात न होता निरनिराळ्या प्रमाणात झाली. याचे कारण ‘तिन्ही गुरूंच्या कार्यानुरूप आणि आवश्यकतेनुसार त्यांना देण्यात आलेल्या मूर्तींमध्ये आवश्यक शक्ती (चैतन्य) संक्रमित झाली.’
– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, मिरज. (६.८.२०१९)
ई-मेल : [email protected]