भाजपच्या आमदाराला तक्रार का करावी लागते ? वास्तविक सरकारनेच हिंदूंचा द्वेष करणार्या अशा मालिकांवर बंदी घातली पाहिजे !
नवी देहली – अॅमेझॉन प्राइम या अॅपवरून प्रसारित होणार्या पाताल लोक या वेबसिरिजच्या (ऑनलाईन प्रसारित होणार्या मालिकेच्या) निर्मात्या अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील लोनी येथील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पोलिसांत तक्रार करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी तक्रारीत म्हटले की, अनुष्का शर्मा यांनी वेबसिरीजमध्ये बालकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारांशी संबंधित नेत्यासमवेत एका पुलाचे उद्घाटन करतांना माझे आणि भाजपचे अन्य नेते यांची छायाचित्रे दाखवली आहेत. माझ्या अनुमतीविना माझ्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला, तसेच वेबसिरीजमध्ये गुर्जर जातीचे डाकू आणि चुकीच्या कामात सहभागी असल्याचे दाखवले आहे. पंजाबचे जाट, ब्राह्मण, त्यागी इत्यादी जातींमध्ये भेदभाव आणि जातीवाचक शब्दांचा वापर करत त्यांचे जीवन खालच्या पातळीवर असल्याचे दाखवले आहे. जो धर्म मुंग्यांनाही खाण्यासाठी पीठ टाकतो आणि विश्व कल्याणासाठी प्रार्थना करतो, त्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा हा प्रयत्न आहे. या मालिकेत विनाकारण मॉबलिंचिंगच्या (झुंडबळीच्या) घटनेचा रामजन्मभूमीच्या कारसेवकांशी जोडून त्यांची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे. या वेबसीरीजमध्ये भाजपची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.