कर्नाटक इस्लामी देश होत आहे ? – भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांचा प्रश्‍न

दावणगेरे येथे हिंदूंच्या दुकानांतून साहित्य खरेदी करणार्‍या मुसलमान महिलांना धर्माधांनी धमकावल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – तबलिगी जमातवाल्यांमुळे शिवमोग्गा येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला, असा आरोप करणार्‍या भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांच्या विरोधात ट्विटवर अरेस्ट शोभा असा ट्रेंड करण्यात आला होता. त्यास प्रत्युत्तर देतांना शोभा करंदलाजे यांनी ट्वीट करून कर्नाटक हा इस्लामी देश होत आहे ? असा प्रश्‍न विचारला आहे. यासह करंदलाजे यांनी दावणगेरे येथे धर्मांधांनी मुसलमान महिलांना हिंदूंच्या दुकानांतून साहित्य खरेदी न करण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. याशिवाय धार्मिक कट्टरतावादी लादत असलेल्या शरियत कायद्याला प्रजासत्ताक भारताच्या कायद्याची चव दाखवली पाहिजे, असे लिहिले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी दावणगेरे प्रकरणी धर्मांधांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.