शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

नवी देहली – देशात कोरोनामुळे लागू असलेल्या दळणवळण बंदीमुळे हिंदूंची मंदिरेही बंद आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये येणारे अर्पणही जवळपास बंद झाले आहे. याचा परिणाम मंदिराच्या खर्चावर होत आहे. यामुळे मंदिरांना बचतीतूनच खर्च भागवावा लागत आहे.

१. श्री वैष्णोदेवी मंदिर खर्च भागवण्यासाठी आता ऑनलाईन देणग्या स्वीकारण्याच्या पर्यायांचा विचार करत आहे.

२. शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराला गेल्या २ मासांत अडीच कोटी रुपयांच्या ऑनलाईन देणग्या मिळाल्या. मंदिराच्या ६ सहस्र कर्मचार्‍यांना एप्रिल मासाचे वेतन देण्यासाठी मुदत ठेवी मोडून त्यांतून पैसे द्यावे लागले. मंदिराचे २ सहस्र ५०० कोटी रुपये मुदत ठेवींच्या रुपात अधिकोषात आहेत.

३. श्री तिरुपती देवस्थानाच्या अनुमाने २२ सहस्र कर्मचार्‍यांचे वेतन, देखरेख आणि सुरक्षा यांवर प्रतिमास ११० कोटी रुपये खर्च येतो. हा खर्च भागवण्यासाठी आता मुदत ठेवी मोडून किंवा सोन्याच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा विचार देवस्थान करत आहे.

४. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्ये गेल्या २ मासांत ९० टक्के घट झाली आहे. मंदिरात अनुमानेे १५० कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन आणि मंदिराची देखभाल यांचा मासिक खर्च अनुमाने ६ ते ७ कोटी रुपये आहे.