पणजी, १६ मार्च (वार्ता.) – गोवा विद्यापिठातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या प्रकरणी साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांच्या विरोधात आगशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. या प्राध्यापकाला कुलगुरूंनी केवळ समज देऊन सोडून दिले, असे वृत्त १५ मार्चला प्रसिद्ध झाले होते. ‘या प्राध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शेट्ये, इनासियो परेरा, रामचंद्र मांजरेकर, जॉन नाझारेथ, प्रेमेंद्र वेर्णेकर, कृष्णा पंडित आणि मारियान फेर्रांव यांनी आगशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हे प्रकरण केवळ एका प्राध्यापकाचे नसून यामध्ये प्राध्यापकासह विद्यापिठातील उच्चपदस्थ अधिकारी आणि एक राजकीय नेता यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यासंबंधी काशीनाथ शेट्ये म्हणाले, ‘‘या तक्रारीची २४ घंट्यांमध्ये नोंद घेतली नाही, तर २ दिवसांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात येईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील. या प्रकरणामुळे गोवा विद्यापीठ प्रशासनाचा कारभार, पारदर्शकता आणि कायद्याचे पालन यांविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोवा विद्यापिठाच्या भौतिकशास्त्र विभागातील साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांनी प्रश्नपत्रिका चोरून त्याच्या प्रेयसीला दिली आणि तिने परीक्षेत चांगले गुण मिळवले. हे प्रकरण पार्सेकर बी.एड्. महाविद्यालयापासून चालू झाले असून गोवा विद्यापिठातही चालू राहिले.’’ या प्राध्यापकाला एका राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याचा आरोप शेट्ये यांनी केला आहे.
संपादकीय भूमिकाशिक्षण क्षेत्रात असे प्राध्यापक असतील, तर भावी पिढी काय घडणार ? आणि देश महासत्तेकडे तरी कशी वाटचाल करणार ? |