संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !

संताजी घोरपडे

पुणे – छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली. त्यांचा दुर्लक्षित पराक्रम पुढील पिढीला समजण्यासाठी संताजी घोरपडे यांचे गाव असलेल्या भाळवणी खानापूर, सांगली येथे आणि मालोजी घोरपडे यांनी युद्ध कौशल्य दाखवलेल्या कारखेव, संगमेश्वर येथे त्यांचे स्मारक निर्माण केले जाणार आहे, अशी माहिती लेखक आणि ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार आणि औरंगजेब’ या विषयाचे अभ्यासक, माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी ११ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी माजी दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील, दिग्दर्शक अमोल गोळे, डॉ. एस्. आंबेकर, आप्पासाहेब नवले, करणसिंह बांदल, एकनाथ दुधे आदी उपस्थित होते. शेखर पाटील यांनी संताजी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित नवीन चित्रपट लवकरच निर्माण केला जाणार आहे.