कोथरूड येथे २१ मार्चला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ !

पुणे – ‘आपला परिसर’ आणि ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ या वर्षी २१ ते २३ मार्च या कालावधीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २१ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र-शिष्य आणि ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे पं. शौनक अभिषेकी, ‘आपला परिसर’चे महेश पानसे आणि विद्येश रामदासी, पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. हेमंत पेंडसे या वेळी उपस्थित होते.

या महोत्सवात ज्येष्ठ गायक, अभिनेते शेखर सेन यांना यंदाचा ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सुभाष कामत यांना ‘ज्येष्ठ संगीतकार’, तर ज्येष्ठ लेखिका शैला मुकूंद यांना पहिल्या ‘विद्या जितेंद्र अभिषेकी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी ५ वाजता केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कथक कलाकार पं. राजेंद्र गंगाणी, गायक इंद्राणी मुखर्जी यांचा सत्कार करण्यात येणार आहे, तर तिसर्‍या दिवशी भजनसम्राट अनुप जलोटा यांचा सत्कार उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जलोटा यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवात देशविदेशांतील कलाकार, अभिषेकी यांचे शिष्य सहभागी होणार आहेत.