अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्या विळख्यात मुठा कालवा !

पुणे – येथील मध्यवस्तीतून जाणारा मुठा उजवा कालवा खडकवासला ते फुरसुंगी ३४ कि.मी. लांबीचा आहे. (हा कालवा एकूण २०२ किमी लांबीचा आहे.) या कालव्याचे आता भूमीगत कालव्यात रूपांतर करून त्या जागेचा वापर रस्त्यांसाठी केला जाणार आहे. सद्यस्थितीत कालव्याच्या दोन्ही बाजूंना रहिवासी अतिक्रमणे झालेली आहेत आणि राडारोडा पडलेला आहे. स्वारगेट ते कँटोन्मेंट बोर्ड परिसरात कालव्याच्या बाजूला कामगारांना रहाण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहेत. रेसकोर्स परिसरात कालव्याच्या बाजूला अनधिकृत मंदिरे उभारली आहेत. सारसबागेजवळ कालव्याच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये एका संघटनेने गोठा चालू केला आहे. खडकवासला ते नांदेड सिटी या भागात कालव्यात राडारोडा टाकण्यात येत आहे. कालव्याच्या आसपास बांधकाम व्यावसायिकांनी विनापरवाना उभारलेल्या मोठमोठ्या इमारतींचा राडारोडा कालव्याच्या काठावर टाकला जात आहे.

कालव्याच्या कडेने सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता असूनही कालव्याच्या काठावरून वाहतूक होत आहे. पर्वती वसाहतीजवळ खासगी बसचालकांनी कालव्याच्या काठावर बसस्थानकच सिद्ध केले आहे. शिंदे वस्ती भागात बेबी कालवा बुजवून रस्ता सिद्ध केला आहे. जलसंपदा विभागाच्या खडकवासला विभागाकडे अतिक्रमणे काढण्यासाठी वेगळा विभाग आहे ; मात्र या विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अतिक्रमणे वाढली आहेत. पाटबंधारे विभागातील कोणत्या अधिकार्‍याच्या अनुमतीने ही अतिक्रमणे झाली आहेत ? अशी शंका सामान्य पुणेकरांनी उपस्थित केली आहे ! (मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे. – संपादक)