आपत्कालीनप्रसंगी रुग्णांवर तातडीने उपचारासाठी आरोग्य क्षेत्रात ‘हेलिकॉप्टर’ सेवेची आवश्यकता ! – विश्वजीत राणे

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

डिचोली, १६ मार्च (वार्ता.) – आपत्कालीन घटनांत रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी आरोग्य क्षेत्रात ‘हेलिकॉप्टर’ सेवेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. डिचोली येथे १६ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या एका मोठ्या आरोग्य शिबिराच्या (मेगा आरोग्य शिबिराच्या) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आरोग्य खात्याच्या गीता नाईक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. आताईद आणि डॉ. सिद्धी कांसार हे मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षाकवच निर्माण केले जात आहे. आरोग्यसेवा घरोघरी पोचवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येकाचे जीवन आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी सरकार कार्यरत आहे. डिचोलीमध्ये आधुनिक सुविधा पुरवण्यावर आमचा भर आहे. हा तालुका आरोग्य सेवेसाठी दत्तक घेतला जाईल. या वेळी राज्यात नवे ६० वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येतील, तसेच रुग्णवाहिकांची संख्या ७५ केली जाईल. राज्यातील विविध रुग्णालयांची निगा गोवा साधनसुविधा महामंडळाकडून राखली जाणार आहे.’’