‘जैन सोशल फेडरेशन’च्या वतीने आनंदधाममध्ये ‘भगवान महावीर व्याख्यानमाला’ !

राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू. श्री. आनंदऋषीजी महाराज

नगर – मानव सेवेची शिकवण देणार्‍या राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू. श्री. आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ वा पुण्य स्मृतीदिन आणि १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘जैन सोशल फेडरेशन’च्या वतीने २१ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत सायंकाळी ७ वाजता आनंदधाममध्ये ‘भगवान महावीर व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांची शिकवण आणि विचार यांनुसार कार्य करणार्‍या ‘जैन सोशल फेडरेशन’ने प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालू केलेली ही व्याख्यानमाला गेल्या ३० वर्षांपासून (कोरोना महामारीचा काळ वगळता) विनाखंड चालू आहे. या व्याख्यानमालेत आदर्श आचारसंहितेचे निर्माते टी.एन्. शेषन, प्रख्यात शास्त्रज्ञ, ज्येष्ठ विचारवंत, भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस्. अधिकारी आदी दिग्गजांसह मान्यवर साहित्यिक आणि टीव्हीच्या मालिकांमधील लोकप्रिय कलाकार यांची व्याख्याने झालेली आहेत.

या वर्षीचे मुख्य प्रायोजक जयकुंवरबाई मोतीलालजी लोढा यांच्या स्मरणार्थ सौ. मनीषा निखिलेंद्रजी लोढा आणि लोढा परिवार आहे. व्याख्यानमालेमधील मार्गदर्शनाचा आणि वक्त्यांच्या प्रगल्भ विचारांचा श्रोत्यांना वैयक्तिक जीवनात निश्चितच लाभ होईल, असा विश्वास ‘जैन सोशल फेडरेशन’ आणि लोढा परिवार यांनी व्यक्त केला आहे; म्हणूनच शहर अन् उपनगर येथील नागरिकांनी ‘भगवान महावीर व्याख्यानमाले’चा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा’, असे आवाहन केले आहे.