पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !

निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले. ते करण्यात आले तेव्हाच पुढे ८ ते १० वर्षे त्याला काही होणार नाही, असे सांगण्यात आले होते. लेपन ४ वर्षांतच करावे लागते याचा अर्थ यापूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असेच म्हणावे लागेल. खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णत: धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाययोजना न काढता रासायनिक लेपन वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरित परिणाम होऊ शकतात, हेही ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये, तसेच अल्पावधीतच मूर्तीवर रासायनिक लेपन करावे लागल्याने त्याला उत्तरदायी असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी स्वीकारले.

या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री संदीप ढगे, राहुल साळुंके, किरण मंजुळे, श्रीनिवास पवार, रमेश पांढरे उपस्थित होते.

या प्रसंगी करण्यात आलेल्या मागण्या

१. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला केली जाणारी रासायनिक लेपनाची प्रक्रिया घाईघाईत न करता वारकरी संप्रदायाला, सर्व विठ्ठलभक्तांना, संत-महंतांना, धर्माचार्यांना विश्वासात घेऊन करावी. या संदर्भात वारकरी, हिंदुत्वनिष्ठ, मंदिर महासंघ यांच्या समवेत बैठक आयोजित करून त्या बैठकीत जो सर्वानुमते निर्णय होईल, तोच घेण्यात यावा.

२. या अगोदर केलेल्या प्रक्रियेतून काय साध्य झाले आणि आताची प्रक्रिया का करावी लागत आहे, हे लेखी सादर करावे, तसेच पुढील प्रक्रिया करण्याच्या अगोदर ‘मूर्तीला काही झाल्यास आम्ही त्याचे दायित्व घेऊ’, असे पुरातत्व विभागाचे संबंधित अधिकारी, तसेच मंदिरे समिती यांनी लिहून द्यावे.