पावणे ३ कोटी रुपयांच्या मद्याची पोलिसांकडून विल्हेवाट

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या वेळी कह्यात घेतल होते मद्य

प्रतिकात्मक छायाचित्रं

सिंधुदुर्गनगरी – मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. या कारवाईच्या वेळी कह्यात घेतलेल्या मद्याची न्यायालयाच्या आदेशानंतर विल्हेवाट लावली जाते. त्यानुसार महाराष्ट्र-गोवा सीमेलगत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर कह्यात घेण्यात आलेल्या २ कोटी ६९ लाख २२ सहस्र ७९२ रुपये मूल्याच्या अवैध मद्याची १० ते १२ मार्च या कालावधीत विल्हेवाट लावण्यात आली.

गोवा राज्यात मिळणार्‍या मद्याच्या मूल्याच्या अडीच ते ३ पट अधिक मूल्य महाराष्ट्रात आहे. त्यामुळे गोव्यातून स्वस्त दरातील मद्याची वाहतूक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. या वेळी अवैध मार्गांचा अवलंबही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍या वाहनांवर उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष असते. वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील कुडाळ येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकूण ४०३ प्रकरणांत २ कोटी ६९ लाख २२ सहस्र ७९२ रुपये मूल्याचे गोवा बनावटीचे मद्य कह्यात घेतले होते. या साठ्यावर ‘रोलर’ (रोलर म्हणजे डांबरीकरण करतांना रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी वापरले जाणारे अवजड वाहन) फिरवून आणि रासायनिक प्रक्रिया करून या मद्याचा पूर्णतः नाश करण्यात आला.