सांगली येथे छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास पाळणार्‍या २ विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळेतून हाकलले

कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश स्कूलमधील प्रकार !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कारवाईची मागणी !

सांगली, १६ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदान दिनानिमित्त धर्मवीर बलीदान मास पाळला; म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश स्कूलमधील शिकणार्‍या २ विद्यार्थ्यांना अपशब्द बोलून वर्गातून बाहेर काढले आणि भर उन्हात उभे रहाण्याची शिक्षा केली. त्यानंतर त्यांना अवमानास्पद बोलून शाळेतून हाकलून दिले. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी या प्रकरणी संजयनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार करून शाळेतील शिक्षक आणि संचालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या तक्रारीच्या आवेदनावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री शिवम हसबे, शिवतेज पाटील, अविनाश ढगे, महादेव पवार, रोहित काळे, ओंकार गडदे, सागर गलांडे, अक्षय शिंदे, राहुल बोळाज, सचिन सूर्यवंशी, शिवराज बेडगे, प्रतिक रसाळा, यश भोसले, रोहित पाटील आदी धारकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संजयनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन धारकर्‍यांना दिले आहे, तसेच धारकर्‍यांनी या प्रकरणाचा निषेध केल्यानंतर शाळेतील संचालक आणि शिक्षक यांनी वरील दोन्ही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश दिला आहे.

संपादकीय भूमिका :

  • ज्या शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास पाळणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जाते, अशा शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना घालायचे का ? ते ठरवावे.
  • अशा शिक्षकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
  • या प्रकरणी आवाज उठवणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे अभिनंदन !

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

१. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदान दिनानिमित्त धर्मवीर बलीदानमास वहाण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येतो.

२. यामध्ये कोणताही जाती-भेद अथवा पक्षभेद न करता सर्व वयोगटांतील सर्व स्तरातील स्त्री-पुरुष, तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थी हा उपक्रम मोठ्या आत्मीयतेने पार पाडत असतात.

३. कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी कु. शौर्य लेगरे (इयत्ता ३ री) आणि कु. आर्यन चव्हाण (इयत्ता ९ वी) हे २९ फेब्रुवारीपासून धर्मवीर बलीदानमास पाळत आहेत. १२ मार्च या दिवशी या दोन्ही विद्यार्थ्यांनी शाळेत जातांना पायात चप्पल घातले नव्हते.

४. त्या वेळी शाळेतील शिक्षिका गडगे, माळी, जगताप आणि संचालक अजित सूर्यवंशी यांनी ‘तुम्ही चप्पल का घालून येत नाही. असले उपक्रम या शाळेत चालणार नाहीत’, असे अपशब्द बोलून त्यांना वर्गातून बाहेर काढले, तसेच भर उन्हात उभे रहाण्याची शिक्षा केली.

५. त्यानंतर ‘तुम्ही घरी जावा. तुमची या शाळेला आवश्यकता नाही’, असे अवमानास्पद शब्द बोलून त्यांना शाळेतून हाकलून दिले. वास्तविक या विद्यार्थ्यांचे वय पहाता शाळेतील शिक्षकांनी बालमनात मानसिक आणि शारीरिक इजा पोचवली आहे.

६. त्यांच्या धामिक भावनांचा हेतूपुरस्सर अवमान केला आहे. त्यामुळे वरील शिक्षकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.