सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त देहू येथे आयोजित हरिनाम सप्ताह !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

देहू (जिल्हा पुणे) – समाजाला कशाची आवश्यकता आहे ? ते विचारात घेऊन मार्गदर्शन करणारा कीर्तनकार हा दिशादर्शक असतो. स्वतः अंध असून भाऊसाहेब विठोबा गोरे यांनी पत्नी सुवर्णा आणि चिरंजीव रामचंद्र यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, हा त्यांच्यातील सद्गुण आहे. अशा सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे. आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले. ‘संत तुकाराम महाराज वाङ्मय संशोधन मंडळा’द्वारे गाथा मंदिर प्रकल्प अंतर्गत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन देहू येथे करण्यात आले आहे. त्या वेळी ते बोलत होते.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील ह.भ.प. भाऊसाहेब विठोबा गोरे महाराज यांचा पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार केला, तसेच ‘संतश्री गुरुकुल संस्था’न संचालित वारकरी शिक्षण संस्थेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला.‌ या वेळी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज वाङ्मय संशोधन मंडळ तथा गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग अनाजी घुले आदी उपस्थित होते.

गुरुकुल समाज घडवण्याचे स्थायी कार्य करत आहे. चांगले साधक सिद्ध होऊन समाजाला दिशा देण्याचे काम करतील, असा विश्वास ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी या वेळी व्यक्त केला.