मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता
भारतातही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे करणार्यांना सरकारने वेळीच शिक्षा करणे आवश्यक !
रियाध – सौदी अरेबियामध्ये एक विदेशी व्यक्ती एका ‘शॉपिंग मॉल’मधील ट्रॉली आणि दरवाजा यांवर थुंकली. त्यामुळे तेथील कर्मचार्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनीही त्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिसांनी या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली असता ती व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सर्दी-खोकल्याचा त्रास आधीपासूनच होता. त्याने केलेले कृत्य इतरांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे समजले जाणार आहे. त्यामुळे ‘त्या व्यक्तीला मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते’, असे वृत्त ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने दिले आहे. सौदी अरेबियात आतापर्यंत १ सहस्र २०३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तेथे ४ जणांचा मृत्यू झाला आहे.