पोलीस असल्याचे सांगून नागरिकांना लुटणार्‍या तिघांना अटक

संचारबंदीचा अपलाभ घेत नागरिकांना धमकावणार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !

मुंबई – पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीचे उल्लंघन केल्याची भीती दाखवून करवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २६ मार्च या दिवशी दहिसर येथील गणेशनगर येथील झोपडपट्टीच्या ठिकाणी ४-५ जण एकत्रित उभे असतांना आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. संशय आल्यामुळे नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क केला असता त्यांनी सांगितलेल्या नावाचे कुणी पोलीस नसल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी येऊन तीनही आरोपींना कह्यात घेतले.