नाशिक येथील सौ. कोमल दौडे यांना आलेल्या विविध अनुभूती

१. विमान प्रवास करत असतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या समवेत सूक्ष्मातून अवकाशवाहनातून जात आहे’, असे जाणवणे : ‘२.११.२०१७ या दिवशी आम्ही विमान प्रवास करत असतांना मला फार भीती वाटत होती. ‘आपण व्यवस्थित पोचू कि नाही ?’, असे विचार मनात येत होते. प्रवास करतांना पाऊस पडत होता आणि विमानाच्या दोन्ही बाजूंनी विजा चमकत होत्या. तेव्हा श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘तू घाबरू नकोस. डोळे बंद कर.’ डोळे बंद केल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण मला त्यांच्या समवेत त्यांच्या अवकाश वाहनातून घेऊन जात आहेत’, असे जाणवले. डोळे उघडल्यावर आकाशातील सौंदर्य फारच छान दिसत होते. परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण मला आकाशातील सौंदर्य दाखवत होते. श्रीकृष्ण आणि गुरुदेव येत आहेत; म्हणून सर्व देवताही आल्या होत्या. वरून सर्वत्र फुलेे पडत होती आणि फार चैतन्य जाणवत होते.

१ आ. नामजप करतांना सगळीकडे श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : ४.११.२०१७ या दिवशी विमानातून परत येतांनाही मला थोडी भीती वाटत होती. माझा नामजप चालू होता. तेव्हा सूक्ष्मातून ‘भगवान श्रीकृष्ण मोरपिसानेे माझ्यावरील आवरण काढत आहे’, असे जाणवले. कृष्ण मला म्हणाला, ‘तू फार नकारात्मक विचार करतेस.’ त्यानंतर ‘कृष्ण मधुर अशी बासरी वाजवत आहे आणि माझ्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होत आहे’, असे जाणवले. विमानात जिथे बघेन, तिथे सगळीकडे बाळकृष्ण दिसत होता.

‘गुरुदेवा, तुम्ही मला तुमच्या समवेत घेऊन आलात, त्यासाठी तुमच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता आहे !

२. भावसत्संग ऐकल्यापासून घरातील कामे सेवाभावाने होणे

२ अ. भावसत्संग ऐकल्यावर ‘परात्पर गुरुदेव घरी येणार’, या भावाने सर्व सेवा केली जाणे : भावसत्संग ऐकल्यावर घरातील कामे सर्व सेवाभावाने होतात. सुखासने (फर्निचर), ‘टेबल’, ‘किचन ट्रॉली’ सर्व भावपूर्ण पुसले जाते. आधी तसे व्हायचे नाही. आता ‘परात्पर गुरुदेव सर्व बघायला स्वयंपाकगृहात प्रवेश करतील आणि तिथे अस्वच्छता असेल किंवा चैतन्य नसेल, तर ते थांबणार नाहीत. त्यांना आवडणार नाही’, असे वाटते. त्यामुळे प्रतिदिन भावपूर्ण सेवा होते. केर काढतांना ‘परात्पर गुरुदेवांच्या चरणांना एकही धुळीचा कण लागायला नको’, असे वाटते. हस्तप्रक्षालनपात्र (बेसिन) धूत असतांना ‘परात्पर गुरुदेव इथे हात धुवायला येणार आणि हे स्वच्छ असेल, तर जिथे जिथे त्यांच्या हाताचे प्रतिबिंब पडेल, तेथील चैतन्याने घरातील प्रत्येकाला लाभ होईल’, असे वाटते.

२ आ. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीच्या जवळ ‘ॐ’ उमटणे : ‘लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीमाता सर्व शृंगारासहित दरवाज्यात उभी आहे’, असे दिसले. मी देवीला म्हणाले, ‘देवी, तू आत ये.’ ‘देवी हळूहळू देवघरात आली आणि जिथे पूजेची मांडणी होती, तिथे ती विराजमान झाली’, असे दिसले. त्या दिवशी सकाळपासून देवघरामध्ये जिथे देवी होती, त्याच्या जवळच ‘ॐ’ उमटलेला दिसत आहे. आता घरात अजून एक ‘ॐ’ उमटलेला दिसत आहे. ‘परात्पर गुरुदेवा आणि भगवान श्रीकृष्णा, तुम्हीच या सर्व अनुभूती देत आहात. तुम्हीच असा भाव ठेवण्यास मला साहाय्य करत आहात.’

‘देवा, तुझा आणि तुझ्या नामाचा कधीच विसर पडू देऊ नका’, अशी प्रार्थना आहे. देवा, माझी लायकी नसतांनाही तुम्ही मला सर्व देवतांचा आशीर्वाद दिलात; म्हणून मी परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी फार फार अनन्यभावे शरणागत होऊन कृतज्ञता व्यक्त करत आहे !’

– सौ. कोमल सचिन दौडे, पंचवटी, नाशिक. (२१.३.२०१८)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.