रत्नागिरी येथील सौ. प्रणाली प्रताप जोशी यांना आलेल्या अनुभूती

१. पहाटे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे

सौ. प्रणाली जोशी

‘माझ्या आईच्या घराशेजारी कर्दळीची झाडे आहेत. २७.९.२०१७ या दिवशी पहाटे ४.१५ वाजता मला तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले उभे असलेले दिसले. त्या वेळी त्यांनी पांढरा सदरा आणि पायजमा घातला होता.

२. अधूनमधून विझलेला दिवा दिसणे, घरात कुणीतरी वावरतांना दिसणे आणि जाणकार व्यक्तींना याविषयी विचारल्यावर त्यांनी अमावास्येच्या दिवशी एक उपाय करण्यास सांगणे, अमावास्येच्या आदल्या दिवशी ‘आता मला जावेच लागेल’, असा एका पुरुषाचा आवाज आल्यावर ‘जा’, असे सांगणे अन् त्यानंतर घरात कुणीतरी येतांना किंवा वावरतांना दिसण्याचे बंद होणे

१९.९.२०१७ या दिवशी अधूनमधून मला विझलेला दिवा दिसायचा. घरात कुणीतरी वावरतांना दिसायचे. मी सहज जाणकारांना याविषयी विचारले. त्यांनी मला गुळासमवेत हळद, पिंजर, पांढरी फुले आणि तुळशीचे पान बाहेर ठेवायला सांगितले आणि ‘जो कुणी अतृप्त असेल, तो मुक्त होऊ दे’, अशी प्रार्थना करायला सांगितली. हा उपाय अमावास्येला करायचा होता. त्याच्या आदल्या दिवशी माझ्या कानावर सूक्ष्मातून शब्द आले, ‘आता मला जावेच लागेल.’ तो पुरुषाचा आवाज होता. तेव्हा मी म्हटले, ‘जा.’ हा उपाय केल्यानंतर मला घरात कुणीतरी येतांना किंवा वावरतांना दिसण्याचे बंद झाले.

३. २ वर्षे सोन्याचा हार किंवा मंगळसूत्र डोळ्यांसमोर दिसणे, देवीची सेवा करणार्‍या व्यक्तीला विचारल्यावर तिने तसे दिसण्यामागील कारण सांगणे आणि देवीला मंगळसूत्र करून वाहिल्यावर सोन्याचा हार किंवा मंगळसूत्र दिसणे बंद होणे

वर्ष २०१६ च्या नवरात्रीत आणि त्याच्या आधी अनुमाने २ वर्षे मला सोन्याचा हार किंवा मंगळसूत्र डोळ्यांसमोर दिसायचे. ‘हे काय आहे ?’, हे मला समजत नव्हते. मी आमच्या ओळखीच्या श्रीमती बने यांना विचारले. त्या देवीची पुष्कळ सेवा करतात. त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या कुटुंबात कुणीतरी देवाला अलंकार देणार असल्याचे सांगितले होते. त्यांना काही कारणास्तव ते जमले नाही; म्हणून तुला हार दिसतो.’’ नंतर मी आमच्या ऐपतीप्रमाणे मंगळसूत्र करून देवीला वाहिले. त्यानंतर वर्ष २०१७ च्या नवरात्रीत ‘वर्षभरात अलंकार किंवा मंगळसूत्र दिसले नाही’, याची आठवण झाली.

४. कोजागरी पौर्णिमेला देवतांची पूजा करतांना गरुडावर बसून कुणीतरी येत असल्याचे दिसणे, ‘गरुड हे श्रीविष्णूचे वाहन आहे आणि श्रीविष्णूच्या समवेत श्री लक्ष्मी असतेच’, हे लक्षात येणे

कोजागरी पौर्णिमेला रात्री १२ वाजता मी देवीला हळद-कुंकू वाहून सर्व देवतांना प्रार्थना करून दूध ठेवत होते. तेव्हा अकस्मात् ‘गरुडावर बसून कुणीतरी माझ्या दिशेने येत आहे आणि त्याचा वेगही पुष्कळ आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर लक्षात आले, ‘गरुड हे श्रीविष्णूचे वाहन आहे आणि श्रीविष्णु आले, म्हणजे तेथे श्री लक्ष्मी असतेच, असे मला जाणवले.’

– सौ. प्रणाली प्रताप जोशी, रत्नागिरी (सप्टेंबर २०१७)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.