१. संत श्री बाळूमामा आदमापूर येथे दर्शनाला बोलावत असल्याचे जाणवणे
‘गेले दोन मास ‘संत श्री बाळूमामा आदमापूर येथे दर्शनाला बोलावत आहेत’, असे मला आतून जाणवत होते. आदमापूर येथे संत बाळूमामांची समाधी आहे. यापूर्वी मी कधीही आदमापूर येथे गेलो नव्हतो. आदमापूर येथे जाऊन बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेण्याविषयीचा विचार मी माझी पत्नी आणि आई यांना सांगितला.
२. संत श्री बाळूमामांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या मेटके या गावातील त्यांच्या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेल्या लाकडी खांबाला हातांनी स्पर्श केल्यावर चांगली स्पंदने जाणवणे
५.२.२०१९ या दिवशी माझा दिनांकानुसार वाढदिवस असल्याने मी सुटी घेतली हेती. त्या दिवशी संध्याकाळी मी कुटुंबियांसमवेत आदमापूर येथे गेलो. आम्ही प्रथम संत बाळूमामांची कर्मभूमी असलेल्या मेटके या गावातील त्यांच्या मंदिरात गेलो. या गावात बाळूमामांचे वास्तव्य होते. तेथे त्यांनी एका लाकडी खांबाची स्थापना केली होती. त्याच स्थानावर आता हे मंदिर बांधण्यात आले आहे. मी त्या खांबाला दोन्ही हातांनी स्पर्श केल्यावर मला चांगली स्पंदने जाणवली. त्यातून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत होती. तेथे काही वेळ थांबून मी प्रार्थना केली. मी मंदिरात प्रसाद वाटणार्या एका व्यक्तीला वरील अनुभूती सांगितली. त्यावर त्याने ‘हे एक जागृत स्थान असून येथे भक्तांना पुष्कळ आश्चर्यकारक अनुभूती येतात’, असे सांगितले. तेथे काही काळ नामजप करून आम्ही आदमापूर येथे जाण्यासाठी निघालो.
३. आदमापूर येथे समाधी मंदिराचे दर्शन देणे
३ अ. समाधी मंदिराच्या परिसरात संत बाळूमामांचे अस्तित्व जाणवणे आणि संत बाळूमामांच्या पादुकांवर मस्तक ठेवल्यावर ‘त्यांनी सूक्ष्मातून डोक्यावर भंडारा टाकून आशीर्वाद दिला’, असे जाणवणे : आदमापूर येथे मंदिराच्या आवारात पाऊल टाकल्यावर मी भारावून गेलो. ‘माझी आदमापूरला येण्याची इच्छा आज देवाने पूर्ण केली’, या विचाराने मला पुष्कळ आनंद झाला. मंदिराच्या परिसरातील वातावरण सुखद होते. मला संत बाळूमामांचे अस्तित्व जाणवत होते. मी समाधीचे दर्शन घेतले. मी समाधीसमोर उभा राहून नामजप करू लागलो. त्या वेळी पुजार्यांनी मला पुढे जाण्याची घाई केली नाही; मात्र ते अन्य भक्तांना पुढे जायला सांगत होते. मी काही क्षण नामजप करून माझे मस्तक संत बाळूमामांच्या पादुकांवर ठेवले. त्या वेळी त्यांनी ‘माझ्या मस्तकावर भंडारा टाकला’, असे मला जाणवले. ‘बाळूमामांनी सूक्ष्मातून डोक्यावर भंडारा टाकून मला आशीर्वाद दिला’, याचा मला पुष्कळ आनंद झाला.
३ आ. मी आईसमवेत गर्भगृहात बसल्यावर मला दर्शनाच्या रांगेत भक्तांची पुष्कळ गर्दी दिसली. ती गर्दी पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. मला मात्र संत बाळूमामांच्या कृपेने विनासायास त्यांच्या समाधीचे दर्शन झाले होतेे. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
३ इ. मंदिराच्या कळसावर असलेल्या ध्वजाच्या वरील ढगांमध्ये ‘ॐ’ दिसणे : मी मंदिरातून बाहेर आल्यावर मला संध्याकाळचे सुंदर वातावरण अनुभवता आले. त्या परिसरात मला संत बाळूमामांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होते. मी माझ्या भ्रमणभाषमधून मंदिराच्या आवारातून दिसणार्या आकाशाचे छायाचित्र काढले. त्या वेळी मंदिराच्या कळसावर असलेल्या ध्वजाच्या वरील ढगांमध्ये मला ‘ॐ’ दिसला. त्याच्या चहूबाजूने सूर्याचे किरण होते. देवाच्या कृपेने आलेल्या या अनुभूतीमुळे माझे मन कृतज्ञतेने भरून आले.’
– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, बेळगाव. (मार्च २०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.