पाटलीपुत्र (बिहार) – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे. यापूर्वी बिहार सरकारने नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवाशांसाठी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक सहस्र रुपये अनुदान घोषित केले होते. आता सरकारने या आदेशात सुधारणा केली असून राज्यातील सर्व भागांत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शहरी भागांसह संपूर्ण राज्यात कुठेही वास्तव्य करणार्या कुटुंबांना प्रती कुटुंब १ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. अशा प्रकारे थेट अर्थसाहाय्याची घोषणा करणारे बिहार हे पहिले राज्य आहे.