‘कोरोना’ म्हणजे ‘कोई रोडपर ना निकले’

पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाविषयी दाखवलेला फलक, ही कोल्हापूरच्या तरुणाची संकल्पना !

कोल्हापूर – पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी योग्य प्रबोधन करणार्‍यांचा उल्लेख केला होता. यामध्ये त्यांना आवडलेला फलक म्हणजे ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’, अशाप्रकारे कोरोनाचा अर्थ दर्शवणारा होता. हा फलक कोल्हापूर येथील ‘अ‍ॅड टुमारो’ या विज्ञापन आस्थापनाचे मालक श्री. विकास डिगे यांनी २२ मार्च या दिवशी झालेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याच्या उद्देशाने हा फलक बनवला होता.

याविषयी श्री. विकास डिगे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी मी निर्माण केलेल्या घोषवाक्याचा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता. एका अर्थी माझ्या कलेचा हा गौरव आहे. हा फलक अनेक जणांनी इतरांना पाठवून जवळजवळ देशभरात पोचवला.’’ श्री. डिगे यांच्या माध्यमातून कोल्हापूरचा पंतप्रधानांनी तिसर्‍यांदा गौरव केला आहे. यापूर्वी ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या ‘लोगो’विषयी श्री. अनंत खासबारदार यांचा आणि पर्यावरणपूरक कामाविषयी ‘निसर्गमित्र संस्थे’चा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गौरवपूर्वक उल्लेख केला होता.