PM Modi On Podcast : वर्ष २००२ पूर्वीही गुजरातमध्ये दंगली झाल्या; मात्र त्यावर कुणीच बोलत नाही !

पंतप्रधान मोदी यांनी वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीवर केले भाष्य !

अमेरिकेतील लेक्स फ्रीडमन यांच्या ‘पॉडकास्ट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतांना

नवी देहली – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आतापर्यंतची मोठी दंगल होती, ही धारणा चुकीची आहे. वास्तव असे आहे की, वर्ष २००२ पूर्वी गुजरातमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. तरीही वर्ष २००२ प्रमाणे त्या कधीही आंतरराष्ट्रीय बातम्या बनल्या नाहीत. तेव्हा आमच्या सरकारने स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले; पण तरीही राजकीय विरोधक आणि माध्यमे यांच्या काही विशिष्ट गटांनी आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न झाला; पण शेवटी न्यायाचा विजय झाला आणि न्यायालयांनी माझे नाव निर्दोष ठरवले, असे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिले. अमेरिकेतील लेक्स फ्रीडमन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेतचा ‘पॉडकास्ट’ (विविध विषयांचे संभाषण मुद्रित करून प्रसारित करणे) प्रसारित झाला आहे.

पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांना गुजरात दंगलीवरून विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील उत्तर दिले. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ३ घंटे संवाद साधला. या संपूर्ण मुलाखतीत पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील प्रवासासह देशातील विविध विषयांवर भाष्य केले. तसेच भारत-चीन, भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांवरही विधान केले. ‘मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कसे सहभागी झाले’, ‘त्यांच्या जीवनात संघाचा काय प्रभाव पडला ?’ अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे पंतप्रधानांनी या मुलाखतीत दिले आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, ज्यांनी दंगलीवरून माझ्यावर टीका केली, त्यांना वर्ष २००२ पूर्वीच्या गुजरातच्या हिंसाचाराच्या इतिहासाची चिंता नव्हती. त्या दंगलीनंतर झालेल्या परिवर्तनातही त्यांना रस नव्हता. त्यांना केवळ त्यांच्या धोरणाला अनुकूल अशी कथा सिद्ध करायची होती. खरेतर अनेक दशकांपासून राजकारणात मतांसाठी काही गटांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा; पण आम्ही हे पूर्णपणे पालटले. आम्ही महत्त्वाकांक्षी राजकारणावर लक्ष केंद्रित केले. वर्ष २००२ नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे.

टीका करणारे नेहमीच जवळ असावेत !

टीका लोकशाहीचा आत्मा आहे. आपले धर्मग्रंथ म्हणतात की, ‘तुमच्या टीकाकारांना नेहमी जवळ ठेवा; कारण ते तुम्हाला सुधारण्यास साहाय्य करतात.’ खरी टीका ही संशोधन आणि विश्‍लेषण यांवर आधारित असते. दुर्दैवाने आजची माध्यमे आणि राजकीय विरोधक अनेकदा ‘शॉर्टकट’ (जवळचा सोपा मार्ग) घेतात. विचारपूर्वक टीका करण्याऐवजी निराधार आरोप करतात; पण आता तुम्ही दंगलीचे जे संदर्भ देत आहात, ते आरोप आहेत, टीका नाही, असेही मोदी या वेळी म्हणाले.