Putin Thanks Trump And Modi : युद्धविरामाच्या प्रयत्नांसाठी पुतिन यांनी ट्रम्प, मोदी आदींचे मानले आभार !

रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धविरामाला सिद्ध !

रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसमवेतचे युद्ध थांबवण्याची सिद्धता दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ३० दिवसांचा युद्धविरामाचा प्रस्ताव आणला आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्जेंडर लुकाशेंको यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले की, ‘आम्ही युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करत आहोत; परंतु आमचा आणखी एक विचार आहे. दोन्ही देशांमधील प्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा काढून युद्धबंदी केली जावी. संकटाचे मूळ कारणच शोधून त्यावर उपाय योजणे आवश्यक आहे.’

यासमवेत पुतिन यांनी पुढे म्हटले की, युक्रेनच्या निर्णयावर इतके लक्ष ठेवणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका यांच्या नेत्यांचे आभार मानतो; कारण त्यांचा उद्देश एक मोठ्या ध्येयाची प्राप्ती करणे, हा आहे, ज्यामुळे जीवित आणि वित्त यांची होणारी हानी टाळता येईल.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी म्हटले की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युद्ध थांबवायचे नाही; परंतु हे ते थेट ट्रम्प यांना सांगायला घाबरतात.