सोलापूर, २६ मार्च (वार्ता.) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती स्थापन केली आहे. या समितीने शहर भागात गर्दी होऊ नये, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होऊ न देणे यांचा आढावा घेऊन लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा होत असल्याची निश्चिती करावी, तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून योग्य कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे प्रत्येक तालुका स्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती नियुक्त करण्यात आली असून गावपातळीवरही समिती नियुक्त करण्यात आली आहे.