ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिली यांनी त्यांच्या स्कॉटलंड येथील घरात स्वत:चे अलगीकरण (सेल्फ क्वारंटाईन) केले होते. यानंतर त्या दोघांची कोरोना चाचणी केली होती. त्यात प्रिन्स चार्ल्स यांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’, तर त्यांच्या पत्नीची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली. प्रिन्स चार्ल्स यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. लंडनच्या बॅकिंगहम पॅलेसमधील एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बॅकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते. त्यामुळे राजघराण्यातील इतर व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ८ सहस्र ७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे.