राजवाड्यातील कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्याने ब्रिटनची द्वितीय राणी ऍलिझाबेथ यांचे स्थलांतर

लंडन – राजवाड्यातील एका कर्मचार्‍याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या द्वितीय राणी ऍलिझाबेथ यांनी त्यांच्या प्रशस्त राजवाड्यातून अन्य ठिकाणी अनिश्‍चित काळासाठी स्थलांतर केले आहे. त्यांचे वय ९३ वर्षे आहे. ‘खबरदारीचा उपाय म्हणून ऍलिझाबेथ यांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे’, अशी माहिती राजवाड्याच्या एका प्रवक्त्याने दिली. अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला. या कर्मचार्‍याला गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. राजवाड्याकडून सदर कर्मचार्‍याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. ऍलिझाबेथ या सदर कर्मचार्‍याच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या कि नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तथापि राजवाड्यातील अनेक महत्त्वाच्या लोकांसह अनुमाने ५०० जण त्या कर्मचार्‍याच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांनाही ‘आयसोलेशन’ कक्षात हलवण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात तेथील सरकारने केलेल्या ‘शटडाऊन’ला राणी ऍलिझाबेथ यांनी पाठिंबा दर्शवून लोकांनाही त्याचे पालन करण्याचे आवाहन केले होते.