‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू घालवण्यासाठी साधिकेने केलेले चिंतन आणि तो न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न !

‘मी १०-१२ वर्षांपूर्वी असे म्हणत असे, ‘मला कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा नाही.’ तेव्हा ‘मला कुणाची आवश्यकता नाही’, या तोर्‍यात मी वागत होते. जेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी समजले, तेव्हा ‘मला इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रयत्न करण्यास आरंभ केला.

१. ‘अपेक्षा करणे’, या अहंच्या पैलूची व्याप्ती काढल्यावर सर्वांत जास्त अपेक्षा पतीकडून असल्याचे लक्षात येणे आणि त्यावर ‘स्वयंसूचना देणे आणि देवाशी बोलणे’ असे प्रयत्न करणे; परंतु अनेकदा प्रसंग घडल्यावर त्याची जाणीव होऊ लागणे

सौ. भारती बागवे

‘मला कुणाकुणाकडून अपेक्षा आहेत ?’, याची मी काही दिवस व्याप्ती काढत होते. तेव्हा ‘मी इतरांवर किती अवलंबून आहे ? इतरांकडून अपेक्षा करण्यात माझा संपूर्ण दिवस वाया जातो’, याची मला जाणीव झाली. अपेक्षेची व्याप्ती काढतांना मी करत असलेली कृती अल्प होती, तर इतरांकडून अपेक्षा करण्याचे प्रमाण अधिक होते. ‘माझ्या सर्वांत अधिक अपेक्षा पतीकडून होत्या’, हे माझ्या लक्षात आले. ‘पतीने मला पैसे द्यावेत’, असा विचार मनात असायचा; म्हणून मी त्यावर स्वयंसूचना देऊ लागले. त्यासंदर्भात मी देवाशी बोलू लागले. तेव्हा अपेक्षेचे प्रसंग घडून गेल्यावर काही घंट्यांनी किंवा मिनिटांनी मला त्याची जाणीव होत असल्याचे लक्षात आले.

२. स्वयंसूचना देत असतांना पूर्वी केलेल्या चुकांची जाणीव होणे आणि त्यावर मात केल्यावर वेगळाच आनंद अनुभवायला मिळणे

मी काही मास (महिने) स्वयंसूचना देत होते. स्वयंसूचना देत असतांना माझ्या लक्षात आले, ‘माझ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात; म्हणून मी पतीकडून पैसे न विचारता घेणेे, खोटे बोलणे आणि वस्तू आणण्यासाठी दिलेल्या पैशांतून उरलेले पैसे स्वतःजवळ ठेवणे’, अशा चुका करत होते. तेव्हा ‘पैसे नसतील, तरी चालेल; पण खोटे बोलण्याचे वाईट कृत्य करायचे नाही. आपण देवाला अपेक्षित अशीच कृती करायची’, असे मी मनोमन ठरवले. तेव्हापासून पैसे हवे असतील, तर खरे बोलून पतीकडून मागून घ्यायचे आणि उरलेले पैसे त्यांना परत करायचे, अशा कृती मी करू लागले. हे करत असतांना मला असे अनुभवायला आले की, ‘आपण चुका करून मायेतील सुख मिळवत होतो; परंतु देवाला अपेक्षित असे केल्यावर वेगळाच आनंद मिळतो.’ माझ्या मनाला शांती मिळू लागली. त्यामुळे माझ्या मनात ‘अपेक्षा करणे’ या दोषावर मात करण्याची तीव्र इच्छा रूजली गेली.

३. देवाने चूक दाखवून देऊन अपेक्षा न करता सकारात्मक राहण्याचा दृष्टीकोन देणे आणि त्यामुळे विचारांच्या स्तरावरील अपेक्षा न्यून होणे

गुरूंच्या कृपेमुळे काही वर्षांनंतर माझ्याकडून योग्य कृती होऊ लागल्या आणि पैशांची निकड (गरज) उणावली. तेव्हा मला वाटले, ‘आपल्या कृती योग्य होत आहेत’; परंतु ‘माझ्या अपेक्षा संपल्या नव्हत्या, तर त्या विचारांच्या स्तरावर कार्यरत होत्या’, याची जाणीव गुरूंनी पुढील प्रसंगातून करून दिली.

मला काही नको होते, तरीही ‘पतीने ‘हे सर्व तुझे आहे’, असे मला म्हणावे’, अशी माझी अपेक्षा होती. त्यावर देवाने विचार दिला, ‘नवरा पैसे कमावतो. कष्टही तोच करतो. मग त्याच्या पैशावर आपण अधिकार का सांगायचा ?’ काही वेळा या प्रश्‍नाचे उत्तर ‘आपल्या मनाच्या सहानुभूतीसाठी आणि मनाला चांगले वाटावे यासाठी असे वाटते’, असे आपण देतो; परंतु ‘या मायेच्या विश्‍वात स्वतः कष्ट करून मिळवलेले पैसे ‘दुसर्‍याचेे आहेत’, असे कोणी सांगेल का ?’ या विचारातून मला अपेक्षा न करता सकारात्मक राहण्याचा दृष्टीकोन मिळाला. ‘आपण पूर्णपणे चुकत आहोत’, हे मनाला पटू लागले. माझ्या विचारांच्या स्तरावरील अपेक्षा न्यून होऊ लागल्या.

४. दोन प्रसंगांत देवाकडून कुठलीही अपेक्षा न करता ‘तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे’, असा विचार केल्यावर देवाकडून साहाय्य मिळणे, तेव्हा ‘इतरांकडून अपेक्षा न करता प्रत्येक प्रसंग स्थिर मनाने स्वीकारल्यावर गुरु साहाय्य करतात’, हे शिकायला मिळणेे आणि ‘अपेक्षा करणे’, या अहंच्या पैलूवर सखोल विचार करण्यासाठी प्रेरणा मिळणे

त्यानंतर मी पैशांचा विषय विसरून गेले होते. आता माझे पूर्ण लक्ष सेवेवर केंद्रित झाले होते आणि मी एका वेगळ्या विश्‍वात वावरत होते. त्यानंतर माझे ‘स्वतःसाठी पैशाचा विचार करणे’ आपोआप थांबले. एकदा मुलाने कराटे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत; म्हणून मी शांत राहिले. नंतर मुलीने क्लासिकल (शास्त्रीय) कर्नाटकी संगीत शिकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ‘त्यासाठी पैसे कोण देणार ?’, या विचाराने मी देवाला प्रार्थना केली. मी गुरुदेवांना सांगितले, ‘गुरुदेव, तुम्ही सर्व जाणता. ‘मी आता काय करायचे ?’, ते तुम्हीच ठरवा. सर्वकाही तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ दे.’ मी प्रार्थना करून शांत राहिले. चार दिवसांनी मुलाच्या नावावर एका संस्थेकडून तो अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी पात्र असल्याचे पत्र आणि पैसे मिळाले. ते पैसे मी मुलाच्या कराटे प्रशिक्षणासाठी भरले. इतर वेळी मी ‘गुरूंनी साहाय्य केले’; म्हणून भारावून गेले असते; परंतु या वेळी मला त्याचे काहीच वाटले नाही; कारण ‘आवश्यकता असेल, तेव्हा गुरु काळजी घेतात’, हा विश्‍वास माझ्या मनात ठाम होता.

या प्रसंगात ‘इतरांकडून अपेक्षा न करता तो प्रसंग स्थिर मनाने स्वीकारल्यावर गुरु साहाय्य करतात’, हे मला शिकायला मिळाले आणि ‘अपेक्षा करणे’ या दोषावर अजून खोलवर चिंतन व्हायला हवे’, ही प्रेरणा मिळाली.

५. प्रार्थना

‘देवा, तुझा मला विसर न पडावा ।
माझे मन एकरूप होऊनी तू मला दिसावा ॥’ 

‘गुरुदेवा, तुम्हीच मला घडवत आहात. माझ्या असंख्य चुका पोटात घालून मला प्रेमाने जवळ घेत आहात. तुम्हीच मला प्रेरणा देत आहात’, यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून ‘तुमच्या अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. भारती बागवे, कॅनडा (२९.३.२०१९)