कोरोनामुळे ५० हून अधिक देशांत ‘दळणवळण बंदी’ !

कोरोनामुळे ५० हून अधिक देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली असून अनुमाने १ अब्ज नागरिक घरातच आहेत. युरोपातील ३४ देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ आहे. कोलंबिया २४ मार्चपासून, तर न्यूझीलंड २५ मार्चपासून पूर्ण बंद होणार आहे.

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ती बसमधून कामावरून शाडोंग प्रांतामधून परत येत असतांना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे

स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह अनेक घरांमध्ये पडून !

स्पेनमध्ये कोरोनामुळे २ सहस्र ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० सहस्रांहून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. अनेक घरांमध्ये मृतदेह पडून असून  ते हटवण्यासाठी सैन्याचे साहाय्य घेतले जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गंभीर आजारी असलेल्या वयोवृद्धांना बेवारस सोडण्यात आले आहे.

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल ‘होम क्वारंटाईन’

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल ‘होम क्वारंटाईन’ (विलगीकरण) झाल्या आहेत. नुकतीच एका डॉक्टरांनी अँजेला मर्केल यांची भेट घेतली होती. ते भेट घेतलेले डॉक्टर कोरोनाच्या वैद्यकीय चाचणीमध्ये ‘पॉझिटिव्ह’ आढळले.

क्रोएशियामध्ये झालेल्या भूकंपात १ ठार

क्रोएशियातील झार्गेब भागात ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये १५ वर्षांचा एक मुलगा ठार होण्यासह अनेक जण घायाळ झाले. तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. उत्तर झार्गेबपासून ७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उद्योगपतींकडून आर्थिक साहाय्याची घोषणा

भारतीय उद्योग श्रेत्रातील मोठी आस्थापने आणि व्यक्ती यांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केले आहे.

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !

राजवाड्यातील कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्याने ब्रिटनची द्वितीय राणी ऍलिझाबेथ यांचे स्थलांतर

राजवाड्यातील एका कर्मचार्‍याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या द्वितीय राणी ऍलिझाबेथ यांनी त्यांच्या प्रशस्त राजवाड्यातून अन्य ठिकाणी अनिश्‍चित काळासाठी स्थलांतर केले आहे.