कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उद्योगपतींकडून आर्थिक साहाय्याची घोषणा

आनंद महिंद्रा

नवी देहली – भारतीय उद्योग श्रेत्रातील मोठी आस्थापने आणि व्यक्ती यांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केले आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतःचे एका मासाचे वेतन देण्याची घोषणा केली. त्या पाठोपाठ वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी १०० कोटी रुपये आणि ‘पेटीएम्’चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

सध्या देशाला आमची (उद्योगपतींची) सर्वांत जास्त आवश्यकता ! – अनिल अग्रवाल

अनिल अग्रवाल

अनिल अग्रवाल यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मी या महामारीविरोधात लढण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. या वेळी देशाला आमची सर्वांत जास्त आवश्यकता आहे. अनेक लोक भविष्याविषयी संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्यासाठी मी खास चिंतेत आहे. आम्ही आमच्याद्वारे साहाय्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.