नागपूर – राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधांचा साठा सापडला. त्या विरोधात अधिवेशनाच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. ‘बनावट बहुमत बनावट औषध’, ‘नकली सरकार नकली औषध’, अशा घोषणा देत आणि काळे फलक हातात धरून निषेध व्यक्त केला. या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करून मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असेही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
राज्यात दीड वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयात बनावट औषधे दिली गेली. जी औषध आस्थापने अस्तित्वात नाहीत, अशा उत्तराखंड आणि झारखंड येथील आस्थापनांना कंत्राट देऊन औषधे मागवली गेली. डॉक्टरांनी ही औषधे ओळखली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ६० दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या आस्थापनांवरील बंदी मागे घेऊन या औषधांचे वितरण चालूच ठेवले. यामुळे महाराष्ट्रातील गरीब जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या घटनेला दीड वर्ष उलटून गेले, तरी अद्याप त्यासंबंधित कोणतेही आस्थापन, मंत्री, अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली नाही; म्हणून आम्ही आज आवाज उठवला, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांना दिली.